Join us

बिग बींचा नवा ‘पार्टनर’

By admin | Updated: August 3, 2016 02:29 IST

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘भूतनाथ रिटर्न्स’ या चित्रपटात पार्थ भालेराव या कलाकाराने रुपेरी पडदा गाजविला होता.

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘भूतनाथ रिटर्न्स’ या चित्रपटात पार्थ भालेराव या कलाकाराने रुपेरी पडदा गाजविला होता. तसेच त्याने राष्ट्रीय पुरस्कारावरदेखील आपले नाव कोरले आहे. महाराष्ट्राचा हा लाडका ‘वंडर किड’ पार्थ भालेराव ‘डिस्को सन्या’ या मराठी चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाविषयी पार्थ भालेराव याने लोकमत सीएनएक्सशी साधलेला संवाद. ‘डिस्को सन्या’ या चित्रपटात तुझी भूमिका काय आहे?- ‘डिस्को सन्या’ या चित्रपटात पहिल्यांदा मी लीड रोलमध्ये झळकत असल्याने खूप आनंदी आहे. या चित्रपटात मी डिस्को सन्याची भूमिका साकारली आहे. डिस्को सन्या हा झोपडपट्टीत राहणारा मुलगा आहे. पण परिस्थितीविषयी कधीही खंत न व्यक्त करता तो आनंदाने आयुष्य जगत असतो. तसेच याही परिस्थितीत तो खूप समजूतदार आहे. असा हा खूप छान अनुभव या चित्रपटाच्या माध्यमातून मला मिळाला आहे. ही भूमिका तुला कशी मिळाली?- पहिल्यांदा निर्माते अभिजित व सचिन सर यांनी पटकथा ऐकविण्यासाठी बोलाविले होते. पण मी चित्रपट करण्यास नकार दिला होता. पण पुन्हा मला काही दिवसांनंतर पटकथा ऐकविण्यात आली. त्या वेळी मी खूप विचार केला आणि ही भूमिका करण्यास होकार दिला. हा माझा निर्णय योग्य होता असे मला वाटते. ‘भूतनाथ रिटर्न्स’ या चित्रपटातदेखील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलाची भूमिका साकारली होती, आता पुन्हा त्याच प्रकारची भूमिका साकारत आहे याबद्दल काय सांगशील?- खरं तर डिस्को सन्या या चित्रपटातील भूमिकादेखील झोपडपट्टीमधील राहणाऱ्या मुलाची असल्याने या चित्रपटाला नकार दिला होता. कारण तो डार्क मेकअप, ते फाटके कपडे, तीच भूमिका करायची नव्हती. त्यानंतर मी चित्रपटाचा विषय समजून घेतला. या चित्रपटाद्वारे एक एक चांगला संदेश मी लोकांपर्यंत पोहोचवू शकतो असं वाटल्याने हा चित्रपट स्वीकारला. सध्या तू बारावीत आहेस, मग अभ्यास आणि चित्रपट या दोन्ही गोष्टी कसे सांभाळतो?- डिस्को सन्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले त्या वेळी मला सुट्ट्या होत्या. आता चित्रपटाचे प्रमोशन असल्याने अभ्यासाकडे थोडे दुर्लक्ष झाले आहे. पण परीक्षेच्या शेवटच्या तीन महिन्यांत अभ्यासावर लक्ष केंद्रित करणार आहे. ‘भूतनाथ रिटर्न्स’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? - बिग बींसोबत काम करण्याचे स्वप्न प्रत्येक कलाकाराचे असते आणि हेच स्वप्न इतक्या लहान वयात पूर्ण झाल्याने मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. तसेच या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ब्रेक मिळाला की, प्रॉडक्शनचे लोक बिग बींना आराम करा असे सांगायचे. त्या वेळी बिग बी म्हणायचे, अभी आराम के दिन निकल चुके है, काम के दिन है. त्यांची ही वाक्ये ऐकून खरेच खूप प्रोत्साहन मिळायचे. त्यांच्याकडून या चित्रपटाच्या दरम्यान खूप काही शिकण्यास मिळाले.अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा एखादा किस्सा ?- बिग बींना भेटण्याच्या पूर्वी खूप भीती वाटत होती. मला वाटले त्यांच्या मूडनुसार वागावे लागणार. पण ज्या वेळी भेटून मी त्यांच्या पाया पडलो त्या वेळी ते म्हणाले, पैर क्यू पड रहे हो, अब तो तुम मेरे पार्टनर हो. त्या वेळी खरेच खूप आनंद झाला. ते मला सेटवर नेहमी चॅम्पियन म्हणायचे. त्यामुळे खूप भारी वाटायचे.तुझे आगामी चित्रपट कोणते? - मी नुकतेच फिरकी या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. हा चित्रपट दिवाळीपर्यंत प्रदर्शित होणार आहे. तर सध्या रंगापतंगाचे दिग्दर्शक प्रसाद नामजोशी यांच्यासोबत म्युझिक पार्लर चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे.