Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यदिनी भरत जाधवचा ट्रिपल धमाका! एकाच दिवशी सादर करणार या तीन नाटकांचे प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 18:11 IST

Bharat Jadhav : मराठी रंगभूमीवर 'सही रे सही', 'श्रीमंत दामोदर पंत', 'ऑल दि बेस्ट', 'आमच्या सारखे आम्हीच' अशी अनेक नाटके त्यांनी गाजवली असून काहीतरी नावीन्यपूर्ण देण्याकडे भरत जाधव यांचा कायमच कल राहिला आहे. त्यामुळे यंदाही असेच काहीतरी नवीन घेऊन येण्यास भरत जाधव सज्ज झाला आहेत.

चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अभिनेता भरत जाधव(Bharat Jadhav)ने छाप उमटविली आहे. अभिनय कौशल्याच्या जोरावर त्याचे फॅन फॉलोव्हिंग वाढलं आहे. अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही त्याने पाऊल ठेवले. मराठी रंगभूमीवर 'सही रे सही', 'श्रीमंत दामोदर पंत', 'ऑल दि बेस्ट', 'आमच्या सारखे आम्हीच' अशी अनेक नाटके त्यांनी गाजवली असून काहीतरी नावीन्यपूर्ण देण्याकडे भरत जाधव यांचा कायमच कल राहिला आहे. त्यामुळे यंदाही असेच काहीतरी नवीन घेऊन येण्यास भरत जाधव सज्ज झाला आहेत.

काही वर्षांपूर्वी १५ ऑगस्ट रोजी 'पुन्हा सही रे सही' या नाटकाचा शुभारंभ  करण्यात आला होता. याच खास क्षणाचे औचित्य साधत भरत जाधव येत्या  १५ ऑगस्ट रोजी नाट्यरसिकांसाठी ट्रिपल धमाका घेऊन येत आहेत. यात एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग एकाच नाट्यगृहात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात हे प्रयोग होणार असून या दिवशी रसिकांना भरत जाधव यांच्या वेगवेगळ्या पात्रांची झलक अनुभवायला मिळणार आहे. यावेळी सकाळी 'अस्तित्व',  दुपारी 'मोरूची मावशी' तर सायंकाळी 'पुन्हा सही रे सही' या तीन नाटकांचे प्रयोग होणार आहेत. वैशिष्टय म्हणजे 'पुन्हा सही रे सही' या नाटकाचा ४४४४ वा प्रयोग यावेळी होणार असून या प्रयोगाला राज ठाकरे यांची उपस्थिती लाभणार आहे. 

भरत जाधव आणि चिन्मयी सुमीत यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'अस्तित्व' या नाटकाची निर्मिती भरत जाधवने केली असून या नाटकाला महाराष्ट्र शासनचा व्यावसायिक नाटकासाठी सर्वोत्कृष्ट निर्मितीचा पुरस्कारही मिळाला आहे. तर भरत जाधवला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या नाटकाचे आतापर्यंत ५८ प्रयोग झाले आहेत. तर मोरूची मावशी या नाटकाने आतापर्यंत ८६२ प्रयोगांचा पल्ला गाठला आहे. त्यामुळे हा ट्रिपल धमाका प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. 

याबद्दल भरत जाधव सांगतो की, ''प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याचा माझा प्रयत्न असतो. यावेळी १५ ऑगस्ट रोजी मी तीन वेगवेगळ्या धाटणीची नाटके नाट्यप्रेमींसाठी घेऊन आलो आहे. या नाटकांवर आणि माझ्या भूमिकांवर रसिकांनी भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळेच ही ऊर्जा मला मिळू शकते. ही तीनही  नाटके प्रेक्षकांसमोर घेऊन येताना मला प्रचंड आनंद होतोय. मला खात्री आहे, प्रेक्षक या तिन्ही नाटकांना प्रतिसाद देतील.''

टॅग्स :भरत जाधव