टीव्ही अभिनेत्री हिना खान कॅन्सरशी झुंज देत आहे. हिनाला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्याचं अभिनेत्रीने काही महिन्यांपूर्वी सांगितलं. सध्या हिना कॅन्सरवर उपचार घेत आहे. हिनानंतर आणखी एका अभिनेत्याला कॅन्सरचं निदान झालं आहे. प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जेसन चेम्बर्सला कॅन्सर झाल्याचं समजलं आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावरुन ही बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. जेसन चेम्बर्सला त्वचेच्या कॅन्सरचं निदान झालं आहे.
बिलो डेक फेम जेसन चेम्बर्सने कॅन्सरचं निदान झाल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. "लहानपणी खेळण्यापासून ते समुद्रात काम करण्यापर्यंत सूर्याच्या किरणांबरोबर इतका वेळ घालवलेल्या व्यक्तीसाठी आता तीच किरणं हानिकारक आहेत. मी सूर्य आणि त्याच्या किरणांपासून मिळणाऱ्या फायद्यांबद्दल जाणतो. पण, प्रत्येक गोष्टीला एक सीमा असते. त्यामध्ये संतुलन राखलं गेलं पाहिजे. त्यामुळे समजुतदारपणे कोणत्याही परिस्थितीशी सामना केला पाहिजे", असं त्याने म्हटलं आहे.
पुढे तो म्हणतो, "मेलेनोमा बायोप्सीच्या उपचारांसाठी मला आता वाट पाहावी लागत आहे. सुरुवातीला मला वाटलं होतं की हा एक डाग असेल पण ६ महिन्यांतच तो बदलला. त्यामुळे लवकर उपचार घेणच योग्य आहे. तुम्हीदेखील काळजी घ्या. आणि रसायनमुक्त सनस्क्रीन वापरा. डोक्यावर टोपी घाला. सावलीत राहा".