Join us
Daily Top 2Weekly Top 5

Val Kilmer: 'बॅटमॅन' फेम लोकप्रिय अभिनेत्याचं वयाच्या ६५ व्या वर्षी निधन, 'या' गंभीर आजारामुळे घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 11:44 IST

बॅटमॅनच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेला अभिनेत्याने वयाच्या ६५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला (val kilmer)

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा एक सुपरहिरो म्हणजे बॅटमॅन. हॉलिवूडमध्ये याच बॅटमॅनच्या (batman) भूमिकेतून लोकप्रिय झालेले अभिनेते वेल किल्मर (vel kilmer) यांचं निधन झालंय. वयाच्या ६५ व्या वर्षी वेल यांनी अखेरचा श्वास घेतला. निमोनिया झाल्याने वेल यांची प्राणज्योत मालवली. वेल यांची लेक मर्सिडीज किल्मरने वडिलांच्या निधनाची दुःखद बातमी सर्वांना सांगितली. मंगळवारी १ एप्रिलला लॉस एँजिलिसमध्ये वेल यांचं निधन झालं. वेल यांच्या निधनामुळे सिनेजगतावर शोककळा पसरली आहे.

वेल यांचं करिअर

वेल यांना २०२४ मध्ये कॅन्सर झाल्याचं निदान झालं होतं. परंतु उपचारानंतर ते ठीक झाले. वेल यांच्या करिअरबद्दल सांगायचं तर १९८४ साली आलेल्या 'टॉप सीक्रेट' या सिनेमातून त्यांनी त्यांच्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली. याशिवाय 'टॉप गन', 'विलो', 'हीट',  'रिअल जिनियस' अशा लोकप्रिय सिनेमांमध्ये वेल यांनी अभिनय केला. वेल यांच्या प्रत्येक भूमिकेने त्यांच्या चाहत्यांचं मन जिंकलं. वेल अभिनेते म्हणून चांगले असल्याने त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

बॅटमॅनमुळे मिळाली लोकप्रियता

वेल किल्मर एक प्रतिभावान कलाकार होते. त्यांनी 'टॉप गन' सिनेमात साकारलेली आइसमॅनची भूमिका लोकप्रिय झाली. याशिवाय 'बॅटमॅन फॉरएव्हर' सिनेमात वेल यांनी साकारलेली बॅटमॅनची भूमिका जगात गाजली. २०११ मध्ये स्वतःच्या आयुष्यावर जो माहितीपट बनला त्यात वेल म्हणाले होते की, "मी अनेकांशी वाईट व्यवहार केला. काही लोकांशी मी विचित्र वागलो. परंतु मला कसलाही पश्चाताप नाहीये. कारण यामुळे मी स्वतःही थोडासा बदललो आहे.  याआधी मला माझ्याबद्दल ज्या गोष्टी माहित नव्हत्या त्या मला ओळखता आल्या."

टॅग्स :हॉलिवूड