नेटफ्लिक्सवरील अतिशय गाजलेली क्राइम-थ्रिलर सीरिज 'कोहरा' चा आता दुसऱ्या सीझन येत आहे. या नव्या भागामध्ये मोना सिंह आणि बरुण सोबती हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. २०२३ साली आलेल्या पहिल्या सीझनमध्ये सुविंदर पाल यांनी पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. त्याच्या प्रचंड यशानंतर निर्मात्यांनी आता नवं कथानक आणलं आहे. बरुण सोबती आणि मोना सिंह मिळून आता क्राईमचा तपास करणार आहेत. या नवीन जोडीमुळे प्रेक्षकांमध्ये मालिकेबद्दलची उत्सुकता कमालीची वाढली आहे.
'कोहरा २'चं दिग्दर्शन पुन्हा एकदा रणदीप झा करत असून, सुदीप शर्मा यांनी या कथेची मांडणी केली आहे. मालिकेचे कथानक पंजाबमधील एका रहस्याभोवती फिरणारे असून, यात एका खुनाच्या तपासासोबतच मानवी नातेसंबंधांमधील तणाव आणि सामाजिक वास्तव उलगडले जाणार आहे. 'कोहरा'च्या पहिल्या भागाप्रमाणेच याही वेळी पोलिसांना सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी धुक्याप्रमाणे पसरलेल्या अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागणार आहे. सीरिजचं पहिलं पोस्टर आज आउट करण्यात आलं.
ही सीरिज ११ फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. पहिल्या सीझनला लाभलेला जागतिक स्तरावरील प्रतिसाद पाहता निर्मात्यांनी यावेळी पटकथेवर अधिक भर दिला आहे. रहस्यमयी कथा आणि दमदार अभिनय यामुळे 'कोहरा २' पुन्हा एकदा ओटीटी प्लॅटफॉर्मवर चर्चेचा विषय ठरणार आहे.