Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बालिका वधू' फेम आनंदीला बॉडीगार्डने केला चुकीच्या पद्धतीने स्पर्श; अविका गौरने सांगितला घडलेला प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 10:37 IST

Avika gor: अविकाने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये पहिल्यांदाच तिने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला.

'बालिका वधू' या गाजलेल्या मालिकेतून नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे अविका गौर (Avika gor). बालिका वधू या मालिकेत आनंदी ही भूमिका साकारुन ती घराघरात पोहोचली. २००८ साली अविकाने सुरु केलेला तिचा फिल्मी प्रवास आजही कायम आहे. अलिकडेच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला.

अविका लवकरच 'ब्लडी इश्क' या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने तिने Hauterrfly ला मुलाखत दिली.  या मुलाखतीमध्ये तिने तिच्या बॉडीगार्डनेच तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचं सांगितलं. Hauterrfly या मुलाखतीचा प्रोमो त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

अविकाला एका अशा व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला ज्याच्याकडून तिला जराही अपेक्षा नव्हती. हे खरंच किती निराशाजनक आहे, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या सुरक्षेसाठी तैनात केली असते आणि तीच व्यक्ती जेव्हा चुकीचं वागते, असं कॅप्शन हा व्हिडीओ शेअर करतांना देण्यात आलं आहे. सोबतच व्हिडीओमध्ये अविकाने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला.

''मला चांगलं आठवतंय कोणी तरी मला पाठीमागून स्पर्श केला होता. मी पाठीमागे वळून पाहिलं तर तो माझा बॉडीगार्डच होता. ज्यावेळी मी कार्यक्रमाच्या मंचावर जात होते त्यावेळी कोणी तरी मला स्पर्श करायचा प्रयत्न केला. मी मागे वळून पाहिलं आणि माझ्या लक्षात आलं की माझ्यासोबत तर फक्त बॉडीगार्डच होता आणि तोच मला दिसला.बाकी तिथे कोणीच नव्हतं. विशेष म्हणजे पुन्हा दुसऱ्यांदा तो माझ्यासोबत तेच करणार होता त्यापूर्वीच मी त्याला अडवलं", असं अविका म्हणालीय पुढे ती म्हणते, "आता तर मी फक्त माझ्याविषयी बोलतीये. माझ्या आसपास तरी बॉडीगार्ड असतांना ही अवस्था आहे. पण, अन्य मुली ज्या दररोज वावरतात त्यांच्यासाठी तर कोणी बॉडीगार्ड नसतो. मग त्यांच्यासोबत असं काही घडलं तर..हे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. "

"जर माझ्यात हिंमत असती तर मी त्याला  दोन कानशिलात लगावून प्रत्युत्तर दिलं असतं. इतकंच नाही तर खूप लोकांनी माझ्या हातचा मार खाल्ला असता. मी नक्कीच असं करु शकते. पण, आशा आहे की अशी वेळच कधी येऊ नये", असंही अविकाने म्हटलं.   दरम्यान, बालिका वधूनंतर अविकाने अनेक मालिका, सिनेमांमध्ये काम केलं. इतकंच नाही तर ती साऊथ इंडस्ट्रीमध्येदेखील झळकली आहे.

टॅग्स :अविका गौरबॉलिवूडसेलिब्रिटीटिव्ही कलाकार