ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - स्टार वन वाहिनीवरील लाडकी मालिका ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ तब्ब्ल दहा वर्षानंतर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मे महिन्यापासून प्रेक्षकांना पुन्हा एकदा या मालिकेचा आनंद घेता येणार आहे. टीव्हीवर मित्र आणि कुटुंबासोबत पाहताना निखळ मनोरंजन करणारी ही मालिका यावेळी वेब सीरिजच्या माध्यमातून येत आहे. निर्माता - दिग्दर्शक जमनदास मजेठिया यांनी मुंबई मिररशी बोलताना या बातमीला दुजोरा दिला आहे.
'मालिकेनंतर आम्ही सर्वजण आपापल्या इतर प्रोजेक्टमध्ये व्यस्त झालो होतो. पण गेल्या 10 वर्षीत मी कोणत्याही सार्वजनिक किंवा खासगी कार्यक्रमात गेलो की मला साराभाई पुन्हा कधी येणार हा प्रश्न हमखास विचारला जायचा. लोकांचं हे प्रेम आणि मागणी पाहता एका उत्तम आणि दर्जेदार स्क्रिप्टसह आम्ही पुन्हा एकदा परत येण्याचा निर्णय घेतला. एप्रिलपासून शुटिंगला सुरुवात होत असून मे महिन्यात रिलीज करण्याची अपेक्षा आहे', अशी माहिती जमनदास मजेठिया यांनी दिली आहे.
2004मध्ये प्रसारित करण्यात आलेली ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. प्रेक्षकांनी मालिकेला अक्षरक्ष: डोक्यावर घेतलं होतं. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आवडलं होतं. मालिकेला इतका चांगला प्रतिसाद मिळत असतानादेखील अवघ्या 69 एपिसोड्सनंतर 10 मार्च 2006 ला मालिका बंद करण्यात आली होती.
गतवर्षी मालिकेत इंद्रवर्धनची व्यक्तिरेखा साकारणारे प्रसिद्ध अभिनेते सतीश शाह यांच्या घरी सर्व कलाकार एकत्र जमले होते. सतीश शाह यांच्यासोबत मालिकेत मुख्य भुमिका साकारणारे रत्ना पाठक-शाह, सुमीत राघवन, रुपाली गांगुली, राजेशकुमार तसंच निर्माते जमनादास मजेठिया, आतिश कपाडिया आणि अभिनेते नसरुद्दीन शाहदेखील उपस्थित होते.
दिग्दर्शक जमनादास मजेठिया यांनी ट्विटरवर सर्व कलाकारांचा फोटो शेअर केला होता. फोटो शेअर करताना सोबतच साराभाईच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज असल्याचं म्हटलं होतं. ही गुड न्यूज म्हणजे मालिकेचा सिक्वेल असावा असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यानुसार साराभाई पुन्हा एकदा आपल्या कुटुंबात प्रवेश करण्यासाठी सज्ज झाले आहेत.