Join us  

Ek Villain Returns Movie Review: पास की फेल? कसा आहे जॉन व अर्जुनचा ‘एक व्हिलेन रिटर्न्स ’? वाचा, रिव्ह्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 4:12 PM

Ek Villain Returns Movie Review: मोहित सूरीचा 'व्हिलन' तब्बल 8 वर्षांनंतर परतला आहे. यावेळी केवळ कथाच नवीन नाही तर स्टारकास्टही पूर्ण नवीन आहे...

संजय घावरे.........................

दर्जा : ** (2 स्टार)कलाकार : जॉन अब्राहम, अर्जुन कपूर, दिशा पाटनी, तारा सुतारीया, जे. डी. चक्रवर्ती, भरत दाभोळकर, दिग्विजय रोहिदास, नेहा शितोळे, सतिश नायकोडी, प्रसाद जावडे, करिश्मा शर्मा, कैझाद कोतवाल, एलेना रॉक्सेना, शाद रंधावादिग्दर्शक : मोहित सूरीनिर्माते : शोभा कपूर, एकता कपूर, भूषण कुमार, कृष्ण कुमारशैली : अ‍ॅक्शन थ्रिलरकालावधी : 2 तास 9 मिनिटे...........................

Ek Villain Returns Movie Review:  ‘तो’ आठ वर्षांनी परतणार असल्यानं सर्वांनाच त्याच्या आगमनाची उत्सुकता होती, पण ‘तो’ घोर निराशा करेल असेल असं मुळीच वाटलं नव्हतं. पदार्पणातील व्हिलनच्या अवतारापेक्षा पुनरागमनातील अवतार खूप भिन्न आहे. एकतर्फी प्रेमाचा बळी ठरलेल्या या व्हिलेनच्या सुमार कामगिरीचं खापर दिग्दर्शक संजय सूरी यांच्या माथ्यावर फुटणार आहे. ‘रेटिंग देना मत भूलना’ असं म्हणणारा हा व्हिलेन चित्रपटासाठी चांगलं रेटिंग मिळवण्यात मात्र मागे राहिला आहे.

कथानक : चित्रपटाची सुरुवात एका सेलिब्रेशन पार्टीनं होते. सोशल मीडियामुळे लोकप्रिय झालेली गायिका आर्वी मल्होत्राच्या घरी पार्टी सुरू असताना अचानक वीज जाते. स्मायली फेस धारण केलेली मुखवटाधारी व्यक्ती खिडकीची काच फोडून आत घुसते आणि एका मागोमाग एक सर्वांना मारते. या घटनेनंतर व्हिलन परत आल्याची जाणिव पोलिसांना होते. या हत्याकांडाचा आरोप एका बड्या बिझनेसमनचा मुलगा असणाऱ्या गौतम मेहरावर टाकला जातो. त्यानंतर कथानक सहा महिने मागे जातं, पुन्हा वर्तमानात परततं. पुन्हा तीन महिने मागे जातं आणि वर्तमानात येत कथेमधील सस्पेंस उघड करतं. यामध्ये सेल्स गर्ल रसिका मापुसकर आणि टॅक्सी ड्रायव्हर भैरव पुरोहित यांचा अत्यंत महत्त्वाचा ट्रॅक गुंफण्यात आला आहे. 

लेखन-दिग्दर्शन : मोहित सूरी यांनी दिग्दर्शनासोबतच असीम अरोरा यांच्यासोबत लेखनही केलं आहे. दोघांनी पटकथेच्या नावाखाली जे सादर केलंय ते पाहताना इतरांपेक्षा काहीतरी वेगळं देण्याच्या नादात प्रत्येक गोष्टीचा अतिरेक केला आहे. सिनेमॅटीक लिबर्टीच्या नावाखाली भारतीय प्रेक्षक काहीही खपवून घेणार नाही हे त्यांना समजलं नाही.

पटकथेतील उणिवांनी या चित्रपटाचा घात केला आहे. आपण जे दाखवतोय ते प्रेक्षकांना कितपत पटेल याचा अंदाज न घेता आपण जे  दाखवू तेच प्रेक्षकांना पटवून घ्यावं लागेल जणू याच आविभार्वात हा चित्रपट बनवल्यासारखा वाटतो. पटकथेतील गुंत्यात चित्रपटच अडकून गेला आहे. काही रहस्य अखेरपर्यंत उलगडू न देण्यात दिग्दर्शकाला यश आलं असलं तरी पुढे काय घडू शकतं याचा अंदाज अगोदरच लागतो. मुख्य व्हिलेनचा चेहरा खूप लवकर दाखवला गेल्यानं उत्सुकता संपते. हत्येनंतर गर्लफ्रेंडसोबत आंघोळ करणं आणि सेक्स करणं हे केवळ बोल्ड दृश्यांसाठी आहे. मानसिकदृष्ट्या विचलीत असलेल्या गुन्हेगारांच्या कथा यापूवीर्ही आल्या आहेत. त्या सर्वांपेक्षा यात खूप काही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, जो यशस्वी झालेला नाही. एका गगनचुंबी इमारतीतील घरात प्रवेश करण्यासाठी व्हिलेन चक्क एका क्रेनवर चढतो आणि तिथून उडी मारून, काच फोडून थेट फ्लॅटमध्ये प्रवेश करतो अशा लॉजिकलेस गोष्टी कशासाठी? हत्यांचा आरोप असलेला श्रीमंत व्यावसायिकाचा मुलगा दिवसाढवळ्या बाईकवरून फिरतो, पण पोलिसांच्या नजरेस पडत नाही, पोलिसांच्या डोळ्यांत धूळ फेकून पसार होतो या गोष्टी न पटण्याजोग्या आहेत. व्हिलन असूनही पहिला चित्रपट सुमधूर संगीत आणि कथानकासाठी नावाजला गेला होता. दुसऱ्यानं सुमधूर संगीत देण्यासाठीही पहिल्याचा आधार घेतला असून त्यातीलच रिक्रिएटेड साँग्ज अधिक भावतात.

अभिनय : आपलं कॅरेक्टर यशस्वीपणे साकारता यावं यासाठी अर्जुन कपूरनं खूप मेहनत घेतल्याचं जाणवतं, पण स्टार अभिनेत्यांच्या यादीत पंक्तीत विराजमान होण्यासाठी त्याला यापेक्षाही काहीतरी वेगळं करावं लागेल. जॉन अब्राहम थकल्यासारखा वाटतो. त्याच्या अभिनयशैलीत जराही नावीन्य जाणवत नाही. दिशा पाटणी प्रत्येक दृश्यात जणू कपडे उतरवण्यासाठी उतावीळ वाटते. तारा सुतारीयानं नेहमीप्रमाणेच अभिनय केला आहे. तिलाही सुधारणेची गरज आहे. भरत दाभोळकर यांनी अर्जुनच्या वडीलांची छोटीशी भूमिका साकारली आहे. जेडी चक्रवर्ती यांनी इन्स्पेक्टर राझीची भूमिका चांगली साकारली असली तरी या व्यक्तिरेखेला पटकथेत फार वाव नाही. नेहा शितोळे, दिग्विजय रोहिदास, करिश्मा शर्मा, कैझाद कोतवाल आदी कलाकारांनीही चांगलं काम केलं आहे.

सकारात्मक बाजू : अर्जुनसोबत सहाय्यक कलाकारांचा अभिनय, कॅमेरावर्क, फाईट सीन्स आणि थोडीफार संगीताची बाजू

नकारात्मक बाजू : गुंतागुंत असलेली आणि उत्सुकता न वाढवणारी पटकथा, पार्श्वसंगीत आणि संकलन 

थोडक्यात : पहिल्या व्हिलेनच्या तुलनेत रिटर्न आलेला व्हिलेन तितकासा प्रभावी नाही. तरीही फावला वेळ असेल आणि टाईमपास करण्यासाठी अन्य पर्याय नसेल तर रिस्क घ्यायला हरकत नाही.

टॅग्स :जॉन अब्राहमअर्जुन कपूरसिनेमाबॉलिवूडतारा सुतारियादिशा पाटनी