Join us  

आर्चीच्या दाक्षिणात्य 'सैराट'चा ट्रेलर रिलीज

By admin | Published: February 25, 2017 10:34 PM

संपुर्ण महाराष्ट्राला याड लावणा-या '‘सैराट’चा कन्नड रिमेक असलेला हा ‘मनसु मल्लिगे’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - 2016 मध्ये संपुर्ण महाराष्ट्राला याड लावणा-या '‘सैराट’चा कन्नड रिमेक असलेला हा ‘मनसु मल्लिगे’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. आपल्या बिनधास्त अंदाजाने सगळ्यांच्या मनात भरलेली रिंकू राजगुरु म्हणजेच आर्चीने या चित्रपटातही मुख्य भूमिका निभावली आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांना याड लावण्यासाठी सैराट सज्ज झाल्याचं दिसत आहे. 
 
आपल्या मराठी सैराटमध्ये असलेलं संगीत काही बदल न करता तसंच ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे प्रेक्षक पुन्हा एकदा झिंगाट होताना दिसतील. काही दिवसांपुर्वी सैराटच्या कन्नड व्हर्जनमधील झिंगाटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. भाषा कळत नसली तरी त्यातील भावना लोकांना कळत असल्याने ठेका धरण्यामध्ये काही अडचण येताना दिसत नाही. 
 
सध्या कन्नड भाषेतील सैराटची फार चर्चा झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटांतील गाण्यांचे ऑडिओ लॉन्च करण्यात आले आहेत. अगदी कमी वेळात या गाण्यांनाही प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. ‘मनसु मल्लिगे’ या चित्रपटाची निर्मिती रॉकलाइन व्यंकटेश करणार आहे. ‘सैराट’च्या दाक्षिणात्य भाषेतील रिमेकचे अधिकार रॉकलाइन व्यंकटेश निर्मिती संस्थेने घेतले असून हिंदी भाषेतील अधिकार करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने विकत घेतले आहेत.
 
२०१६ हे वर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी फार महत्त्वाचे वर्ष ठरले. ‘सैराट’ चित्रपटाने जुने विक्रम मोडीत अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले.  सैराट’मुळे रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर हे दोन नवे चेहरे चित्रपटसृष्टीला मिळाले. आर्चीचा हा दाक्षिणात्य चित्रपटदेखील मराठी चित्रपटाप्रमाणेच हीट होणार असा अंदाज लावता येत आहे. कारण दाक्षिणात्य भागात सैराट आणि या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. म्हणूनच थेट या चित्रपटाचा रिमेक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.