Join us
Daily Top 2Weekly Top 5

शहिदांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी 'अॅप' बनवण्याचे अक्षयचे आवाहन

By admin | Updated: November 8, 2016 12:42 IST

देशासाठी प्राणांचे बलिदान देणा-या शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी एक अॅप बनवूया असे आवाहन अभिनेता अक्षय कुमारने केले.

ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. ८ - ' देशासाठी प्राण त्यागणा-या, लढणा-या शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी एक अॅप तयार करूया' असे आवाहन बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने केले आहे.   'सैनिक', 'बेबी', 'हॉलिडे' या व अशा अनेक चित्रपटांमधून सैनिकाची भूमिका निभावणारा खिलाडी अक्षयने मंगळवारी जम्मू येथे भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या बेस कॅम्पला भेट देऊन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात अनेक जवानांना प्राण गमवावे लागले. त्या शहिदांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांना आदरांजली वाहण्यासाठी अक्षय जम्मूत दाखल झाला असून यावेळी त्याने इतर जवानांना संबोधित केले.
(अक्षयकुमार घेणार यवतमाळमधील पिंप्री बुटी गाव दत्तक)
 
'आज इथे येऊन मी तुमची भेट घेऊ शकलो, हे खरंच माझं भाग्य आहे. मी नेहमी म्हणतो की मी 'रील' (खोटा / पडद्यावरचा) हिरो आहे, पण तुम्ही तर 'रिअल' हिरो आहात' अशा शब्दांत अक्षयने जवानांचे कौतुक केले. ' देशात असे अनेक नागरिक आहेत ज्यांना सैन्यातील जवानांना, शहिदांच्या कुटुंबीयांना मदत करण्याची इच्छा आहे. आपण त्यांच्यासाठी एक अॅप का बनवू नये?' असे विचारत त्याने सर्वांना मदतीचे आवाहन केले. 'मात्र यात कोणतेही राजकारण नसून केवळ जवानांच्या प्रेमापोटी आपण हे बोलत आहोत' असेही त्याने स्पष्ट केले. 
बॉलिवूडमधील संवेदनशील अभिनेता अशी ओळख असलेल्या अक्षयने नुकतेच यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त गाव दत्तक घेण्याची घोषणा केली आहे.