मराठी अभिनेताअंकुश चौधरी (ankush chaudhari) हा सर्वांचा लाडका अभिनेता. रंगभूमीपासून अंकुशने प्रवास सुरु केला. आज तो मराठी इंडस्ट्रीतील सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. अंकुश चौधरीने गेल्या काही वर्षात अभिनयासोबतच दिग्दर्शनाची जबाबदारीही सांभाळली आहे. अंकुशने अलीकडे सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय आहे. नुकतीच अंकुशने पालघरमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी अंकुशने दिवंगत अभिनेते प्रदीप पटवर्धन (pradip patwardhan) यांची आठवण जागवली आहे.
अंकुश चौधरीने व्हिडीओ शेअर करुन लिहिलंय की, "पालघरचं माझ्यासाठी एक वेगळंच स्थान आहे. या ठिकाणी माझ्या पहिल्या मराठी मालिकेसाठी शूटिंग केलं होतं. दूरदर्शनवरील आजीची गोधडी ह्या मालिकेच्या शूटिंगसाठी मी इथे आलो होतो. मला आठवतंय, त्यावेळी तिथल्या एका स्थानिक कार्यक्रमाला गेस्ट म्हणून स्व. प्रदीप पटवर्धन सर आले होते. मालिकेच्या संपूर्ण टीमने संध्याकाळी शूटिंग संपवलं आणि त्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती, फक्त त्यांना पाहण्यासाठी. कारण ते खूप मोठे स्टार होते."
"आज तीस वर्षं लोटली, मी पुन्हा पालघरमध्ये आलो. तिथल्या स्थानिक कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून. कधीकाळी ज्या नजरेने आम्ही आमच्या आवडत्या कलाकारांकडे पाहायचो, त्याच नजरेने लोक पाहत होते. आणि माझे डोळे त्या गर्दीत कुठेतरी पुन्हा तीस वर्षा पूर्वीच्या मला शोधत होते. या कार्यक्रमात उपस्थिस्तव असलेल्या सर्व लोकांनी, महिलांनी दाखवलेल्या उत्साहामुळे, प्रेमामुळे मला मजा आली आणि दिल खुश झाला. ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालघर पुन्हा अनुभवायला मिळाल. श्री. राहुल प्रकाश पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार!"