नात्यांचे बदलत जाणारे स्वरूप, या बदलत जाणाऱ्या नात्यांमध्ये साहजिकच वाढलेला दुरावा, अशी आजच्या मॉडर्न युगातील नात्यांची समीकरणं आहेत. या कालानुरूप बदलत गेलेल्या नात्यांमधली भावनिक गुंतागुंत आपल्याला आगामी ‘& जरा हटके’ या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेली निर्मितीसंस्था इरॉस इंटरनॅशनल; तसेच मराठी चित्रपटसृष्टीला सुपरहिट सिनेमे देणारे सुप्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव या दोघांनी मिळून या सिनेमाची निर्मिती केली आहे. ‘&’ हे मुळाक्षर दोन वेगवेगळ्या शब्दांना एकत्र करणारे असल्यामुळे या चित्रपटात हटके लव्हस्टोरी बघायला मिळणार आहे. एका मध्यमवयीन स्त्री-पुरुषाच्या सुंदर नात्याभोवती सिनेमाची कथा फिरतेय. मध्यमवयात पुन्हा विवाह करण्यासारखा धाडसी निर्णय हे जोडपं घेतं. मग, त्यांचं हे नातं त्यांची मुलं कसे स्वीकारतात, यावर हा चित्रपट आहे. त्यांच्यातील वाद-हेवेदावे आणि याबरोबरच ओघाने येणाऱ्या जनरेशन गॅपचा समतोल ‘& जरा हटके’ या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. मिताली जोशी यांनी या सिनेमाची कथा लिहिली असून, प्रकाश कुंटे यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. ‘कॉफी आणि बरंच काही’ या सिनेमातून आपले दिग्दर्शकीय पदार्पण करणारे प्रकाश कुंटे यांनी या सिनेमात एक कुटुंबाची हृदयस्पर्शी कथा मांडली आहे. या सिनेमातील ‘सांग ना’ हे रोमँटिक जॉनरचे गाणे मंगेश कांगणे यांनी लिहिले आहे, तर शैल हाडा आणि हमसिका अय्यर या जोडगोळीने गायलेले हे गाणे मृणाल कुलकर्णी आणि इंद्रनीलसेन गुप्ता यांच्यावर चित्रित आले आहे. याच चित्रपटातील ‘उमलून आले हे’ नात्यांमधील टप्पे दाखवणारे गाणे संदीप खरे यांनी लिहिले असून, शाशातिरुपती यांनी स्वरबद्ध केले आहे. मृणाल कुलकर्णी, इंद्रनील सेनगुप्ता, सिद्धार्थ आणि शिवानी या चौघांवर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. आदित्य बेडेकर हे या सिनेमाचे संगीत दिग्दर्शक आहेत. वासुदेव राणे हे या सिनेमाचे सिनेमॅटोग्राफर असून, मयूर हरदास यांनी या सिनेमाचे संकलन केले आहे. असा हा हटके कहाणी असणारा ‘& जरा हटके’ चित्रपट २२ जुलैला प्रदर्शित होणार आहे.
नात्यांतील बदलत्या स्वरूपांना जोडणारा ‘& जरा हटके’
By admin | Updated: July 16, 2016 01:27 IST