नातेसंबंधांवर भावोत्कट चित्रपट निर्माण करणारे, अशी महेश भट्ट यांची खास ओळख आहे. दिग्दर्शन क्षेत्रातून बाहेर पडलेले महेश भट्ट आता लेखक म्हणून आपल्या लेखणीतून मानवी नातेसंबंध आणि नात्यांच्या संवेदनांचा तळ शोधत आहेत. त्यांची कंपनी विशेष फिल्म्सने तयार केलेल्या ‘हमारी अधूरी कहानी’ या चित्रपटाची कथा महेश भट्ट यांचीच आहे. महेश भट्ट यांच्याकडून दिग्दर्शनाचे धडे गिरविलेल्या मोहित सुरी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. इमरान हाश्मी, विद्या बालन आणि राजकुमार राव हे कलावंत प्रमुख भूमिकांत आहेत. दिग्दर्शक मोहित सुरी यांनी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी चित्रपटाचे माध्यम प्रायोजक असलेल्या ‘लोकमत’च्या मुंबई कार्यालयात येऊन चित्रपटाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर संपादकीय चमूशी केलेल्या चर्चेचा हा गोषवारा...या चित्रपटाकडून खूप काही शिकायला मिळाले - दिग्दर्शक मोहित सुरी‘आशिकी २’ आणि ‘एक व्हिलन’च्या यशाने उत्साहित मोहित सुरी म्हणाले, की मी या तिन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन केले ही बाब वगळता या चित्रपटांचा एकमेकांशी संबंध नाही. ‘आशिकी २’नंतर महेश भट्ट यांनी याची (हमारी अधूरी कहानी) कथा मला दिली. मी त्यावर चित्रपट बनवावा, अशी त्यांची इच्छा होती. ‘आशिकी २’ आणि ‘एक व्हिलन’च्या तुलनेत या कथेत खूपच भावोत्कटता असल्यामुळे माझ्यासाठी ही कथा वेगळी होती. मी या कथेला एक आव्हान म्हणून स्वीकारले आणि चित्रपटावर काम सुरू केले. भट्ट साहेबांनी (महेश भट्ट) या चित्रपटात आपले अनुभव मांडले होते, त्यामुळे कथेचे भावनात्मक मूल्य आमच्या सर्वांसाठी खूपच वाढले होते. आमच्या सर्वांच्या जीवनात प्रेम अधुरेच राहाते आणि त्याची सल आयुष्यभर आपली सोबत करते. याच अपरिपूर्णतेबाबत आम्ही एक असा चित्रपट बनवला आहे, की प्रेक्षक त्यात स्वत:ला पाहू शकतील. दिग्दर्शक म्हणून हा माझा दहावा चित्रपट आहे; परंतु तरीही ठामपणे हे सुद्धा म्हणू शकतो की, जेवढे या चित्रपटातून शिकायला मिळाले तेवढे यापूर्वी कधीही शिकायला मिळाले नव्हते. प्रेमाचा प्रत्येक रंग पडद्यावर आणणारा हा चित्रपट प्रेम प्राप्त करण्याच्या मनोकामनेसह त्यागाचाही संदेश देतो. या चित्रपटाला स्त्रीप्रधान चित्रपट म्हणता येईल का, या प्रश्नावर मोहित सुरी म्हणाले की, एका महिलेसोबत दोन पुरुष पात्र असलेल्या चित्रपटाबाबत असे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र मला असे वाटते की सर्व पात्रे एकमेकांशी बांधली गेलेली आहेत. आमच्या जीवनावर नेहमीच महिला पात्रांचा प्रभाव राहातो, आई-बहीण, प्रेयसी, पत्नी आणि मुलीच्या रूपात. प्रत्येक रूपात महिलांच्या भावना आम्हाला जीवनातील सर्व काही देतात. महिलांचा सन्मान करणे आवश्यक आहे, हाच आमच्या चित्रपटाचा संदेश आहे. नाते आणि परंपरेच्या नावावर त्यांचे स्वातंत्र्य ओलीस ठेवता येऊ शकत नाही. कहानी ऐकून रडलो होतो -इमरान हाश्मीइमरान हाश्मीने मोहित सुरीच्या नऊ चित्रपटांपैकी सात चित्रपटांत नायकाची भूमिका साकारली आहे. तो म्हणाला की या चित्रपटातील माझ्या पात्राचे नाव आरव असून, तो १०० हून अधिक पंचतारांकित हॉटेलांचा मालक आहे. मात्र खासगी आयुष्यात -जीवनात तो प्रेमासाठी आसुसलेला असतो. त्याचे बालपण खूपच अडचणींनी व्यापलेले होते. वडील घर सोडून गेले. आई हॉटेलमध्ये गाणे सादर करून घर चालवायची व या कामासाठी तिला अपमानितही व्हावे लागायचे. आई एकाच्या प्रेमात पडली, तरीही तिला कोणताही आनंद मिळाला नाही. या कारणामुळे आरव मोठा होऊन एवढा पैसा कमवायचा की पुढे कधी त्रास होऊ नये, या उद्देशाने तो यशस्वी होतो़ परंतु वैयक्तिक आयुष्यात तो प्रेमासाठी भुकेला असतो. एकटेपण त्याला जीवघेणे वाटते. वसुधा (विद्या बालन) त्याच्या जीवनातील प्रेमाची पोकळी भरून काढते, तरीही प्रेम अपूर्णच राहते आणि वसुधासाठी आरव मोठा त्याग करायलाही मागेपुढे बघत नाही. इमरान हाश्मी या चित्रपटाला त्याच्या आयुष्यातील सगळ््यात कठीण चित्रपट समजतो. महेश भट्ट यांनी पहिल्यांदा या चित्रपटाचा विषय काढला तेव्हा मी अशी भावनात्मक भूमिका करू शकेन का, असा मला प्रश्न पडला होता असे त्याने सांगितले. माझ्या वागण्यामुळे भट्ट थोडेसे नाराजही झाले होते. ‘आशिकी-२’नंतर महेश भट्ट आणि मोहित सुरी यांनी हाश्मी याला कथा ऐकविली तेव्हा माझ्यासाठी तो वेगळा अनुभव होता. पहिल्यांदा कथा ऐकूनच मी रडायला लागलो व मला न घेता तुम्ही हा चित्रपट तयार करू नका, असे मी त्यांना सांगितले. मला अशा प्रकारची भूमिका साकारण्याची संधी भट्ट आणि मोहित यांनी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. इमरान हाश्मीला निश्चितपणे असे वाटते, की या चित्रपटातील भूमिका व हा चित्रपट त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला नवे वळण देणारा आहे. मी अशा प्रकारच्या भूमिका साकार करू शकतो, असे पटवून द्यायला हा चित्रपट महत्त्वाचा ठरेल, असे त्याने सांगितले.इमरान हाश्मी आणखी एक रोचक गोष्ट सांगतो, ती म्हणजे या चित्रपटाशी महेश भट्ट यांच्यासारखेच माझेही खासगी जीवनातील अनुभव संबंधित आहेत. मी १२ वर्षांचा असताना एक घटना घडली होती व ती मी भट्ट यांना सांगितली होती. त्यांनी ती बाब माझ्या भूमिकेला जोडून टाकली. हा चित्रपट बघितल्यावर मला काय म्हणायचे आहे ते समजेल. सीरिअल किसर या आपल्या प्रतिमेबद्दल बोलताना इमरान हाश्मी म्हणाला, की प्रेक्षकांना यात माझ्या भूमिकेवरच लक्ष द्यायला संधी आहे. माझा हा चित्रपट व त्यातील भूमिका दीर्घकाळ प्रेक्षकांच्या लक्षात राहील, अशी खात्री आहे. विद्या बालन यात सीता, राधा आणि दुर्गेच्या रूपात दिसेल.विद्या बालन प्रथमच महेश भट्ट यांच्या चित्रपटाशी जोडली गेल्याने सध्या खूप उत्साही आहे. तिला आठवते की ती जेव्हा चित्रपटसृष्टीत आली तेव्हा महेश भट्ट यांनी दिग्दर्शन सोडून दिले होते. त्यांच्या चित्रपटात काम करायला ती खूप इच्छुक होती, परंतु संधी दिसत नव्हती. ‘आशिकी-२’ पाहून मी मोहित सुरींच्या दिग्दर्शनामुळे खूपच प्रभावित झाले व मला तुमच्यासोबत काम करायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली. भट्ट साहेबांनाही मी फोन केला होता. काही दिवसांनंतर भट्ट आणि सुरी यांनी मला कथा ऐकविली, मला ती एवढी आवडली की मी तत्काळ त्यात काम करायची तयारी दाखविली. भट्ट साहेबांनी लिहिलेल्या चित्रपटात काम करायची संधी मिळाली याचाच मला आनंद होता. भट्ट यांच्या चित्रपटांत स्त्री पात्र कमालीचे प्रभावी असते. या चित्रपटात माझी भूमिका वसुधाची आहे. छोट्याशा गावात मोठी झालेल्या वसुधेला हेच शिकविलेले असते, की लग्नानंतर तिचा पती आणि सासरच सगळे काही असते. वसुधा स्वत:चे अस्तित्व विसरून पतीला आनंदी ठेवते. पत्नीच्या हातावर आपले नाव गोंदवून पती जणू काही ती आपली मालमत्ता आहे, असे जाहीर करतो. वसुधाही ते सहज मान्य करते. पाच वर्षांचा मुलगा व पत्नीला सोडून वसुधाचा पती गायब होतो. वसुधा तरीही मंगळसूत्र हेच सर्वस्व मानते आणि पती परत येईल अशी वाट बघते. विद्या आपल्या या भूमिकेसाठी भट्ट यांनी काय म्हटले होते ते आठवते. ही भूमिका आधी सीतेसारखी असते. नंतर ती राधेचे रूप घेते व नंतर अशी परिस्थिती निर्माण होते की वसुधा दुर्गा बनते.
नातेसंबंधांच्या सर्व रंगछटांचे कोंदण... ‘हमारी अधूरी कहानी’
By admin | Updated: June 14, 2015 04:08 IST