गेल्या काही महिन्यांंपासून मनोरंजन विश्वात एका सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. हा सिनेमा म्हणजे 'दृश्यम ३'. अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने सर्वांना उत्सुकता आहे. अशातच चाहत्यांसाठी आनंदाची बातमी. 'दृश्यम ३'ची नुकतीच अधिकृत घोषणा झाली आहे. पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेत अजय देवगणची खास झलक प्रेक्षकांना बघायला मिळतेय.
'दृश्यम ३'ची घोषणा
'दृश्यम' चित्रपटाने बॉक्स ऑफिस रेकॉर्ड तोडण्यासोबतच 'फॅमिली थ्रिलर' हा एक नवा जॉनर प्रेक्षकांसमोर आणला. विजय साळगावकर हे पात्र आता एक आयकॉनिक व्यक्तिमत्त्व बनले आहे. आपल्या कुटुंबासाठी एक वडील काय करू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे साळगावकर. दरवर्षी २ ऑक्टोबरला सोशल मीडियावर 'दृश्यम'मधील त्या प्रसिद्ध सहलीच्या आठवणी आणि मीम्सचा पूर येतो. मात्र, २ ऑक्टोबर २०२६ हा दिवस अधिक खास ठरणार आहे, कारण अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेत 'दृश्यम ३' मधून जगभरातील चित्रपटगृहांमध्ये परतत आहे.
'आखरी हिस्सा बाकी है', असा अजय देवगणचा संवाद 'दृश्यम ३'मध्ये बघायला मिळणार आहे. 'दृश्यम ३' या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू असून विविध शहरांमध्ये याचे शूटिंग होणार आहे. यावेळी चित्रपटाची व्याप्ती आणि कथानकातील ताण आधीच्या भागांच्या तुलनेत अधिक भव्य आणि चित्तथरारक असणार आहे.
अजय देवगणसोबतच तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर आणि इतर मूळ कलाकार या तिसऱ्या भागातही पाहायला मिळतील. याशिवाय दुसऱ्या भागात दिसलेला अक्षय खन्ना 'दृश्यम ३'मध्ये दिसणार का, याची सर्वांना उत्सुकता आहे. अक्षय खन्ना दिसणार की नाही? हे चित्र थोड्याच दिवसात स्पष्ट होईल.
'स्टार स्टुडिओ १८' प्रस्तुत आणि 'पॅनोरमा स्टुडिओ'ची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक पाठक करत आहेत. या कथेचे लेखन अभिषेक पाठक, आमिल कियान खान आणि परवीज शेख यांनी केले आहे. आलोक जैन, अजित आंधारे, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आता सर्वांना २ ऑक्टोबर २०२६ ची उत्सुकता आहे.