ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात घेण्यावरुन वाद-विवाद सुरु असताना अभिनेता अजय देवगणने उरी हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी मदतीचा हात दिला आहे. अजय देवगणने 'शिवाय' चित्रपटाच्या एका शोची पुर्ण कमाई शहीद जवानांच्या कुटुबीयांना देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय रिलीज झाल्याच्या दिवशी जो शो सर्वात जास्त कमाई करेल त्याचे संपुर्ण पैसे शहीदांच्या कुटुंबांना मदत म्हणून देण्यात येणार आहेत.
अजय देवगणने सर्व वितरकांना पहिल्या शोसंबंधीची माहिती पुरवण्यासंबंधी अगोदरच सांगून ठेवलं आहे. सर्व शोची माहिती मिळाल्यानंतर सर्वात जास्त कमाई कोणत्या शोमधून झाली याची माहिती घेण्यात येईल आणि ती कमाई शहीद जवानांच्या कुटुंबांना देण्यात येईल. अजय देवगणची शिवाय चित्रपटात मुख्य भुमिका असून दिग्दर्शही केलं आहे. सोबतच चित्रपटाचा सह-निर्मातादेखील आहे. 28 ऑक्टोबरला दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपट रिलीज होणार आहे.