हिंदी चित्रपट - अनुज अलंकारचांगल्या चाललेल्या चित्रपटाचा सिक्वेल करण्यात मोठी जोखीम ही असते की आधीच्या कलाकृतींशी ताळमेळ राखण्यात त्यांना बहुतांशवेळा अपयश येणे. ‘हाऊसफुल्ल ३’बाबतही असेच काहीसे घडले आहे. ताज्या हाऊसफुल्लमध्येही प्रेक्षकांना हसविण्यासाठी आधीच्या चित्रपटांत जे काही करण्यात आले होते ते सगळे ठासून भरले आहे. आधीच्या आवृत्त्यांमध्ये जे बघितले तेच पुन:पुन्हा यातही बघावे लागते. क्वचित एखाद्या दृश्याचा अपवाद असेल.हाऊसफुल्ल ३ची कथा परत लंडनमध्येच सुरू होते. बटुक पटेल (बोमन इराणी) यांना तीन मुली आहेत. गंगा पटेल (जॅकलीन फर्नांडिस), जमुना पटेल (लिसा हेडन) आणि सरस्वती पटेल (नरगिस फाकरी). आपल्या कोणत्याच मुलीने लग्न करू नये अशी बटुक पटेलची इच्छा असते. वडिलांच्या उपस्थितीत या तिन्ही मुली मोठ्या सालस व सामान्य दिसतात. परंतु त्यांच्या मागे तिघीही मॉडर्न व ग्लॅमरस असतात. तिघीही आपली नावेसुद्धा बदलून घेतात. गंगा बनते ग्रेसी, जमुना जैनी तर आणि सरस्वती बनते सारा. तिघींना बॉयफ्रेंडही मिळतात. सँडी (अक्षय कुमार) मिळतो गंगाला. जमुनाचा असतो बंटी (अभिषेक बच्चन) आणि टेडी (रितेश देशमुख) साराचा बॉयफ्रेंड बनतो. या तीन प्रेमकथांना मुंबईचा माफिया डॉन जॅकी (जॅकी श्रॉफ) नवे वळण देतो. अपेक्षेनुसार चित्रपटाचा शेवट आनंदी होतो. उणिवा : या वेळी दिग्दर्शनाची जबाबदारी फरहाद-साजिद या जोडीला मिळाली. या दोघांनी यापूर्वी अक्षयसोबत ‘एंटरटेन्मेंट’ केला आहे. या दिग्दर्शक जोडीबाबत एवढेच म्हणता येऊ शकते की, ते लेखक म्हणूनच बरे आहेत. त्यांचा दिग्दर्शनाचा सोस जेवढ्या लवकर संपेल तेवढे ते त्यांच्यासह प्रेक्षकांच्या हिताचे आहे. ही जोडी उथळपणा आणि शिळ्या विनोदालाच कॉमेडी समजत असेल तर देवच त्यांचे भले करो. ‘एंटरटेन्मेंट’नंतर त्यांनी आणखी एक संधी गमावली आहे. कलाकारांबाबत बोलायचे झाल्यास अक्षय कुमार अशा भूमिका सुंदर रीतीने साकारतो. या वेळीही त्याने भुरळ घालेल असा अभिनय केला आहे. रितेश देशमुखनेही चांगला अभिनय केला आहे. मात्र, ज्युनिअर बच्चन अर्थात अभिषेकने पुन्हा एकदा निराशा केली. कॉमेडीपासून रोमान्सपर्यंत सर्वत्र त्याचा अभिनय फिका वाटतो. अभिषेकला कॅमेऱ्यासमोर काहीतरी होते आणि तो अभिनय करायचे विसरतो, असे वाटते. तिन्ही नायिका केवळ ग्लॅमरसाठी असून त्या तेच काम करतात. नर्गिस आणि लिसा हेडन यांचा अभिनय कुठेही दिसत नाही. दोघींची संवादफेक अत्यंत वाईट आहे. बोमन इराणी आणि जॅकी श्रॉफने आपापल्या भूमिकांना न्याय दिला आहे. चित्रपटाचे संगीत प्रभावी नाही. एकही गाणे श्रवणीय नाही. वैशिष्ट्ये : अक्षय कुमार चित्रपटाचा ढासळणारा तोल सावरण्याचा खूप प्रयत्न करतो. हेच या चित्रपटाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य आहे. रितेशनेही अक्षयला पुरेपूर साथ दिली आहे. या दोघांच्या अभिनयाशिवाय लंडनमधील लोकेशनही चांगले आहे. संथ गती असूनही चित्रपट अधूनमधून प्रेक्षकांना हसवितो. का पाहावा? अक्षय आणि रितेशच्या विनोदी अभिनयासाठी.
का पाहू नये? ढिसाळ लेखन, जुन्या मसाल्याचा वापर निराशाजनक आहे.
एकूणच काय तर मसाला चित्रपट आवडणाऱ्या प्रेक्षकांना चित्रपट आवडू शकतो. मात्र, ‘हाऊसफुल्ल’ होईल, असे म्हणणे जरा अतिच ठरेल.