Join us

'लक्ष्या गेल्यानंतर माझी पंचाईत झाली कारण...'; अशोक सराफ यांनी मनातली भावना सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 13:47 IST

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी जगाचा निरोप घेतल्यावर अशोक सराफ यांची काय अवस्था झाली, याचा त्यांनी खुलासा केलाय (ashok saraf, laxmikant berde)

अशोक सराफ - लक्ष्मीकांत बेर्डे या जोडीला न विसरता येणं केवळ अशक्यच. या दोघांचे सिनेमे आजही प्रेक्षकांना खळखळून हसवतात. 'अशी ही बनवाबनवी', 'बाळाचे बाप ब्रम्हचारी', 'धूमधडाका', 'शेजारी शेजारी' हे अशोक - लक्ष्मीकांत यांचे सिनेमे प्रचंड गाजले. या दोघांच्या विनोदाचं अफलातून टायमिंग विलक्षण होतं. एकमेकांच्या तोडीस तोड असणाऱ्या या कलाकारांना मोठ्या पडद्यावर अभिनय करताना पाहायला मजा यायची. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काही वर्षांपूर्वी जगाचा निरोप घेतला. लक्ष्या गेल्यानंतर अशोक यांची काय अवस्था झाली, याचं वर्णन त्यांनी एका मुलाखतीत केलंय.

अशोक सराफ यांनी 'लक्ष्या'विषयी केल्या भावना व्यक्त

महाMTBला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ म्हणाले, "लक्ष्याची निरीक्षणशक्ती कमाल होती. त्याने निरीक्षण करुन अनेक गोष्टींचा अभ्यास केला त्यामुळे तो यशस्वी झाला. लक्ष्या माझा चांगला मित्र होता. लक्ष्या आणि मी जवळजवळ ५० पिक्चर एकत्र केले. या सिनेमांमध्ये कधी तो माझा सेक्रेटरी, कधी मित्र, कधी भाऊ अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये होता. त्याच्यासोबत काम करताना मजा आली."

अशोक सराफ पुढे म्हणाले, "आमच्या दोघांचं टायमिंग हे बरोबर जमायचं. माझ्याबरोबर त्याने टायमिंग जुळवून घेतलं. एखाद्यासोबत टायमिंग जुळवून घेणं ही खूप कठीण गोष्ट आहे. पण त्याने जुळवून घेतलं. तो गेल्यानंतर माझी थोडीशी पंचाईत झाली. म्हणजे आपल्या लेव्हलचा टायमिंग साधणारा माणूस मिळाल्यावर जी खास गोष्ट घडते ती गेली. त्यामुळे तो गेल्यानंतर थोडंसं वेगळं झालं." अशाप्रकारे अशोक सराफ यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी जगाचा निरोप घेतल्यावर त्यांच्यावर कसा परिणाम झाला, हे सांगितलंय.

टॅग्स :अशोक सराफलक्ष्मीकांत बेर्डे