गेल्या १३ वर्षांपासून पिच्छा पुरवत असलेल्या संकटातून सलमान खानची अखेर सुटका झाली. मुंबई उच्च न्यायालयाने १० डिसेंबर रोजी सलमानला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त केले. या निकालामुळे बॉलीवूड, सलमानचे चाहते तसेच त्याचे कुटुंबीय एवढेच नाही तर खुद्द सलमाननेही सुटकेचा नि:श्वास सोडला असेल. मात्र, हा उच्च न्यायालयाचा निर्णय असून, महाराष्ट्र सरकार आणि अपघात पीडितांकडे सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे. पुढे काय होईल हे येणारा काळच सांगेल. तूर्तास सलमानची या प्रकरणातून सुटका झाली हीच वस्तुस्थिती मानावी लागेल. पुढील काळात सलमान आरोपी असलेल्या काळवीट शिकार प्रकरणाचा निकाल येणार असून, न्यायालयीन निर्णय काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहील. हिट अॅण्ड रन प्रकरणातून सुटका झाल्याच्या पार्श्वभूमीवर काळवीट प्रकरणातूनही सलमान सहीसलामत सुटेल, अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे. तथापि, हा कयास असून न्यायालयाच्या निकालानंतरच चित्र स्पष्ट होईल. सलमानबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालावरून गुरुवारी दिवसभर वृत्तवाहिन्यांवर चर्चा झडत राहिली. निकालाबाबत तऱ्हेतऱ्हेचे तर्कवितर्क लढविण्यात येत होते. ते पाहून मीडियाने सलमानच्या खटल्याला राष्ट्रीय मुद्दा बनविल्याचे वाटत होते. सलमानच्या नावावर टीआरपी वाढविण्याची मीडियाला नामी संधी मिळाली होती आणि मीडियाने तिचा पुरेपूर लाभही उठविला. १० डिसेंबर रोजी सर्व वृत्तवाहिन्यांवर फक्त आणि फक्त सलमान खानचाच विषय सुरू होता. ते पाहून सलमानच्या खटल्याशिवाय देशात किंवा जगात दुसरा कोणताही मुद्दा महत्त्वपूर्ण नाही, असेच वाटत होते. बॉलीवूड ताऱ्यांशी संबंधित मुद्द्यांना मीडिया नको तेवढे उचलून धरतो. हे शोचनीय आहे. यापुढेही हेच वाहिन्यांवर पाहावयास मिळेल. सलमान खान स्टार आहे; परंतु तो एक माणूसही आहे आणि एका कुटुंबासाठी मुलगा, भाऊही आहे. त्यांच्या वलयाला बाजूला ठेवून या मुद्द्याकडे पाहिल्यास या प्रकरणामुळे सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांना किती वेदना सोसाव्या लागल्या असतील हे त्यांनाच ठाऊक. आता प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाईपर्यंत तरी सलमानचे कुटुंबीय तणावमुक्त राहतील हे निश्चित. बॉलीवूडच्या अंगाने विचार केल्यास सलमानचे स्टारडम आता आणखी वेगाने वाढेल. सध्या तो ‘सुल्तान’ या एकाच चित्रपटात काम करीत आहे. ‘सुल्तान’नंतर तो दुसऱ्या चित्रपटांतही काम करील, अशी शक्यता आहे. सुभाष घई यांचे एक विधान काल खूपच चर्चेत राहिले. सलमान आता वैवाहिक जीवनाबाबत विचार करू शकतो, असे ते म्हणाले होते. न्यायालयातील खटल्यांमुळे आपण आपल्या विवाहाबाबत गांभीर्याने विचार करीत नाही, असे सलमान स्वत: म्हणत आला आहे. सलमान जर बुद्धिवादी असेल तर काळवीट शिकार प्रकरणाचा अंतिम निकाल येईपर्यंत तो आपल्या याच विचारांवर ठाम राहील. कोणतीही व्यक्ती आपल्या वाढदिवशी विशेष भेट मिळण्याची आशा करतो. - संडे स्पेशलअनुज अलंकार
अखेर प्रतीक्षा संपुष्टात...
By admin | Updated: December 13, 2015 00:19 IST