Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडच्या नकाशावर कोल्हापूर जिल्ह्यातील मसाई पठार, चित्रीकरणाची लगबग

By संदीप आडनाईक | Updated: February 7, 2026 16:01 IST

पन्हाळगड चित्रीकरणाचे माहेरघर

संदीप आडनाईककोल्हापूर : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या आगामी ‘विठाई’ या बहुचर्चित चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापूर जिल्ह्यातील मसाई पठारावर होणार आहे. येत्या १८ तारखेपासून या चित्रपटातील महत्त्वाची दृश्ये मसाई पठारावर चित्रित केली जाणार आहेत, त्यामुळे हे पठार पुन्हा एकदा बॉलिवूडच्या नकाशावर झळकणार आहे.‘विठाई’ हा चित्रपट महाराष्ट्राच्या लोककलेचा अभिमान असलेल्या लावणीसम्राज्ञी विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आहे. श्रद्धा कपूर या चित्रपटात विठाबाईंच्या भूमिकेत झळकणार आहे. मराठी संस्कृती आणि तमाशा कलेचा संघर्षमय प्रवास मोठ्या पडद्यावर मांडणारा हा चित्रपट छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या दिग्दर्शनाखाली साकारत आहे. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन करत असून, योगिराज बागुल यांनी लिहिलेल्या ‘विठाबाईचं आयुष्य’ या पुस्तकावर आधारित आहे.श्रद्धा कपूरने या भूमिकेसाठी सुप्रसिद्ध कोरिओग्राफर वैभवी मर्चंट यांच्या मार्गदर्शनाखाली लावणी नृत्याचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे. या चित्रपटातील काही दृश्यांसाठी पन्हाळा आणि परिसरातील स्थानिक कलाकारांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याने त्यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे. निसर्गरम्य पठार आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे या दृश्यांना वेगळाच साज चढणार आहे.‘पद्मावत’चेही झाले होते चित्रीकरणउल्लेखनीय म्हणजे याच मसाई पठारावर यापूर्वी धुरंधर अभिनेता रणबीर सिंग याच्या ‘पद्मावत’ हिंदी चित्रपटाचे शूटिंग झाले होते. मात्र त्या वेळी शूटिंगदरम्यान लागलेल्या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले होते. तसेच राजस्थानमध्ये वाद निर्माण झाल्यामुळे दिग्दर्शक निर्माता संजय लीला भन्साळी यांनी या बहुचर्चित द लिजंड ऑफ पद्मावती या चित्रपटाच्या नावात बदल केला होता.

पन्हाळगड चित्रीकरणाचे माहेरघरऐतिहासिक आणि पौराणिक स्थान म्हणून पन्हाळगड प्रसिद्धच आहे. कोल्हापूरपासून अवघ्या २० किलोमीटरवर हे ठिकाण असल्यामुळे या परिसरात अनेक हिंदी-मराठी चित्रपटांचे चित्रीकरण होत आले आहे. बीस साल बाद, राम और श्याम, गोपी या जुन्या हिंदी चित्रपटांसह सूत्रधार, जीवा, प्रेमग्रंथ, आमीर खान अभिनित सरफरोश अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांचे चित्रीकरण पन्हाळा येथे झाले आहे.