पहलगाम हल्ल्यानंतर (pahalgam attack) सर्वांना चांगलाच धक्का बसला आहे. अशातच लवकरच प्रभाससोबत सिनेमात झळकणाऱ्या एका अभिनेत्रीवर तिचा पाकिस्तानाशी संबंध आहे, असे आरोप लावण्यात आले. या अभिनेत्रीचं नाव आहे इमानवी. प्रभाससोबत (prabhas) 'फौजी' या सिनेमात इमानवी झळकणार आहे. अशातच इमानवी आणि तिच्या कुटुंबाचा पाकिस्तानी आर्मीशी संबंध असल्याचं सांगितलं गेलं. याप्रकरणी इमानवीने सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहून या आरोपांचं खंडन केलं याशिवाय तिच्या कुटुंबाची पार्श्वभूमी सांगितली.
प्रभाससोबत 'फौजी' चित्रपटात काम करणाऱ्या इमानवीने सोशल मीडियावर लिहिलंय की, “मी भारतीय-अमेरिकन आहे, पाकिस्तानशी माझा काही संबंध नाही, माझ्या कुटुंबातील कुणीही कधीही पाकिस्तानी लष्कराचा भाग राहिलेला नाही. ही एक अफवा असून हे सर्व खोटं आहे. काही ऑनलाइन ट्रोलर्सनी द्वेष पसरवण्यासाठी माझ्याविरुद्ध ही खोटी बातमी व्हायरल केली आहे. सगळ्यात दुःखद बाब म्हणजे सोशल मीडिया युजर्सनीही योग्य माहितीची पडताळणी न करता या गोष्टी पसरवल्या.”
"मी एक भारतीय-अमेरिकन मुलगी असून मला याचा अभिमान आहे. मी हिंदी, तेलुगू, गुजराती आणि इंग्रजी भाषा बोलते. माझा जन्म लॉस एंजेल्स, कॅलिफोर्नियामध्ये येथे झाला. माझे आई-बाबा अमेरिकेत कायदेशीररीत्या स्थायिक झाले. पुढे ते अमेरिकन नागरीक बनले. मी अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये माझं शिक्षण पूर्ण केलं. नंतर अभिनय, नृत्य आणि कोरिओग्राफीमध्ये आपलं करिअर घडवलं.” अशाप्रकारे प्रभाससोबत 'फौजी' सिनेमात काम करणाऱ्या इमानवीने सर्व अफवा फेटाळून लावल्या.
पहलगाम हल्ल्याविषयी इमानवी म्हणाली की, "कुठल्याही निरपराध व्यक्तीचा मृत्यू फारच दुःखद असतो. हा हल्ला माझ्या मनावर मोठा आघात करणारा आहे. मी या घटनेची तीव्र शब्दांत निंदा करते. मला आशा आहे की लवकरच तो दिवस येईल, जेव्हा आपण सर्वजण एकत्र येऊ.” इमानवी ही एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून ती लवकरच 'फौजी' या सिनेमात प्रभाससोबत काम करताना दिसणार आहे.