Join us  

सासूच्या निधनानंतर खदाखदा हसत होती अर्चना पूरणसिंह; स्पष्टीकरण देत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 5:28 PM

Archana puran singh : अर्चनाच्या हसण्याच्या स्टाइलमुळे अनेकदा प्रेक्षकांनाही हसू येतं. इतंकच नाही तर तिच्या हसण्यावरुन काही जण तिला ट्रोलही करतात. यामध्येच सध्या तिचा एक जुना किस्सा चर्चिला जात आहे.

अर्चना पूरण सिंह हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही प्रेक्षकासाठी नवीन नाही. असंख्य चित्रपट, रिअॅलिटी शोच्या माध्यमातून ती सातत्याने चाहत्यांच्या भेटीला येत असते. गेल्या काही काळापासून द कपिल शर्मा मध्ये झळकणाऱ्या अर्चनाने या शोमधून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे आता लवकरच ती इंडियाज लाफ्टर चॅम्पियन या नव्या शोमध्ये दिसणार आहे. म्हणून, सध्या ती सोशल मीडियावर तिची चर्चा रंगली आहे. अर्चनाच्या हसण्याच्या स्टाइलमुळे अनेकदा प्रेक्षकांनाही हसू येतं. इतंकच नाही तर तिच्या हसण्यावरुन काही जण तिला ट्रोलही करतात. यामध्येच सध्या तिचा एक जुना किस्सा चर्चिला जात आहे. अर्चनाच्या सासूचं निधन झालेलं असतानाही तिला नाईलाजाने हसावं लागलं होतं.

अर्चना लवकरच इंडियाज लाफ्टर चॅम्पियन  या नव्या शोमध्ये झळकणार आहे. त्यामुळे या शो निमित्ताने तिने एक मुलाखत दिली. यावेळी सासूबाईंचं निधन झालेलं असतानाही केवळ एका प्रोजेक्टमध्ये तिला मनाविरुद्ध हसण्याचा सीन करावा लागला होता, असं तिने या मुलाखतीत सांगितलं.

"आपल्याला कायम हसत रहायला पाहिजे. पण, काही वेळा आपलं हे हसणंच आपल्याला जास्त दुखावतं. कधी कधी आपली इच्छा नसतानाही हसावं लागतं आणि हेच कलाकाराचं आयुष्य असतं. आजही तो क्षण आठवला की डोळ्यातलं पाणी थांबत नाही. कॉमेडी सर्कसचं शुटिंग सुरु असताना मला मनात नसतानाही हसण्याचे सीन करावे लागले होते. त्यावेळी माझ्या सासूबाई खूप आजारी होत्या आणि त्यांच्यावर आंबानी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्या काळात मी सेटवर शुटिंग करत होते. शुटिंग सुरु असतानाच संध्याकाळी ६ वाजता त्यांचं निधन झाल्याची माहिती मिळाली.  मी तात्काळ सेटवर याची माहिती दिली. मात्र, १५ मिनिटांचा एक सीन द्या आणि जा असं मला प्रोडक्शनकडून सांगण्यात आलं", असं अर्चना म्हणाली.

पुढे ती म्हणते, “त्यावेळी माझ्या सगळ्या रिअॅक्शन या हसण्याच्या होत्या. यामध्ये, मला कमी-अधिक, जोरात, सौम्य, म्हणजे हास्याच्या प्रत्येक छटा यामध्ये दाखवायच्या होत्या. या काळात मी कॅमेरा समोर जोरजोरात हसत होते. पण, आतून माझं मन प्रचंड रडत होतं. तो काळ माझ्यासाठी खरंच फार कठीण होता."

दरम्यान, अर्चनाचा नवा शो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोमध्ये अर्चनासह शेखर सुमन परिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर रॉशेल राव या शोचे सूत्रसंचालन करणार आहे.

टॅग्स :अर्चना पूरण सिंगबॉलिवूडसेलिब्रिटीटेलिव्हिजन