मुंबई- अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांचे ब्रेकअप होऊन आता बराच काळ लोटला. या मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. पण सुशांत वा अंकिता दोघांनीही या ब्रेकअपबद्दल एक अवाक्षरही काढले नाही. खरे तर या ब्रेकअपमुळे अंकिता तुटून पडली. काही काळ नैराश्यानेही तिला ग्रासले. पण तरिही तिने आपले मौन तोडले नाही़. आता मात्र तिने आपली चुप्पी तोडली आहे. होय, ताज्या मुलाखतीत तिने आपले मन मोकळे केलेच. ‘सुशांतसोबतचे नाते कधीचेच तुटले आहे...’, हे अंकिताने या मुलाखतीत मान्य केले. होय, ते नाते तुटले आणि त्याचा सर्वाधिक परिणाम माझ्यावर झाला. मी काम सोडले. कारण त्या काळात मला ब्रेकची गरज होती. त्या ब्रेकच्या काळात माझ्या कुटुंबाने, माझ्या मित्रांनी मला प्रचंड मदत केली. सुशांतसोबत राहताना मी स्वत:ला विसरले होते. स्वत:वर प्रेम करायला विसरले होते. स्वत:ला विसरून मी ते नाते जगत होते. पण त्या नात्याने मला खूप मोठा धडा शिकवला. मी स्वत:वर प्रेम करणे शिकले. माणसांना ओळखणे मी शिकले. कुणाला किती आणि कुठे प्राधान्य द्यावे, हे मला त्या नात्याने शिकवले. आता मी गोष्टी संतुलित करू शकते़, असे अंकिता यावेळी म्हणाली.
अभिनेत्री अंकिता लोखंडेने ब्रेकअपवर तोडली चुप्पी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 02:29 IST