Join us

अभिनेत्री आरती अग्रवालचे निधन

By admin | Updated: June 7, 2015 22:54 IST

लठ्ठपणा कमी करण्यासाठी करण्यात येणारी लिपोसक्शन शस्त्रक्रिया अयशस्वी होऊन, आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने तेलगू अभिनेत्री आरती अग्रवालचे अमेरिकेत निधन झाले.

न्यूजर्सी : लठ्ठपणा कमी करण्यासाठी करण्यात येणारी लिपोसक्शन शस्त्रक्रिया अयशस्वी होऊन, आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने तेलगू अभिनेत्री आरती अग्रवालचे अमेरिकेत निधन झाले.३१ वर्षाच्या या अभिनेत्रीने तेलगू, तामिळ व हिंदी अशा २५ चित्रपटांत काम केले होते. राणम २ हा तिचा तेलगू चित्रपट तेलंगणा व आंध्र प्रदेशात शुक्रवारी प्रसिद्ध झाला असून, शनिवारी तिचा मृत्यू झाला आहे. तिच्या व्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार आरती स्थूलत्व व इतर विकाराने ग्रस्त होती. न्यूजर्सी येथील एका रुग्णालयात तिच्यावर उपचार चालू होते. तिला दम्याचा विकार होता व तिच्यावर झालेल्या लिपोसक्शन शस्त्रक्रियेमुळे हा हृदयविकाराचा झटका आला. अग्रवालला गेल्या काही वर्षापासून दम्याचा त्रास होत होता. महिन्यापूर्वी तिच्यावर लिपोसक्शन शस्त्रक्रिया झाली; पण त्यानंतर तिला श्वसनाचा त्रास होऊ लागला. २००१ साली तिचा पहिला तेलगू चित्रपट नवू नाकू नाचव प्रसिद्ध झाला. नवू लेका, नेनु लेनु, इंद्रा, वसंतम हे तिचे चित्रपट गाजले. चिरंजीवी, व्यंकटेश, नागार्जुन या अभिनेत्यांबरोबर तिने काम केले. आरती अग्रवालचा जन्म न्यूजर्सी येथे झाला होता. तिने पागलपन या हिंदी चित्रपटात काम केले. पण हा चित्रपट आपटला, त्यामुळे ती तेलगू चित्रपटाकडे वळली. २००५ साली सहकलाकाराने फसविल्यामुळे, तसेच चित्रपट क्षेत्रातील अपयशामुळे तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. २००८ ते १५ या सात वर्षात तिने फक्त चार चित्रपट केले. त्यामुळे ती विस्मरणात गेली होती, असे चित्रपट कलाकार संघटनेच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)