Join us

"मी रिटायरमेंट घेत नाहीये तर.."; अभिनयातून निवृत्तीच्या घोषणेनंतर विक्रांत मेस्सीने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला-

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 14:00 IST

अखेर विक्रांत मेस्सीने त्याच्या रिटायरमेंट घोषणेवर मौन सौडलं असून स्पष्टीकरण दिलंय (vikrant massey)

काल २ डिसेंबरला विक्रांत मेस्सीने भल्या पहाटे लांबलचक पोस्ट लिहून एक मोठी घोषणा केली. ती पोस्ट वाचून विक्रांतने बॉलिवूडमधून संन्यास घेतला असून वयाच्या ३७ व्या वर्षी विक्रांत बॉलिवूडमधून निवृत्त होत असल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या. विक्रांत या पोस्टनंतर याबाबत कुठेच काही बोलला नव्हता. अखेर एका मुलाखतीत विक्रांतने त्याच्या रिटायरमेंटबद्दल मोठा खुलासा केलाय. तो रिटायरमेंट घेत नसून फक्त एक ब्रेक घेणार आहे, हे त्याने स्पष्ट केलंय.

विक्रांतने रिटायरमेंट घोषणेवर मौन सोडलं

News18 showsha ला दिलेल्या मुलाखतीत विक्रांतने सांगितलं तो कधीच अभिनयातून निवृत्त होणार नसून त्याला फक्त एका ब्रेकची गरज आहे. विक्रांतने स्पष्टीकरण दिलं की, "मी रिटायर होत नाहीये. मी थोडा थकलोय त्यामुळे मला एका मोठ्या ब्रेकची गरज आहे. माझी तब्येतही ठीक नाहीये. लोकांनी चुकीचं वाचलंय." असं उत्तर विक्रांतने दिलंय. त्यामुळे विक्रांतच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. याचाच अर्थ तो काहीसा ब्रेक घेऊन स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देऊन विक्रांत पुन्हा एकदा अभिनय करण्यास सज्ज असेल.

विक्रांतने पोस्ट काय लिहिली होती?

विक्रांतने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. यात तो म्हणाला होता की, "जसजसा मी पुढे सरकतोय तसतसे मला वाटते की आता घरी जाण्याची वेळ आली आहे. पती, वडील आणि मुलगा म्हणून आणि अभिनेता म्हणूनही. त्यामुळे येत्या २०२५ मध्ये आम्ही एकमेकांना शेवटची भेट घेणार आहोत. जोपर्यंत वेळ योग्य वाटत नाही." यावरुन विक्रांत अभिनयातून कायमची निवृत्ती घेणार अशा चर्चा रंगल्या. आता विक्रांतने तो निवृत्त होत नाही तर ब्रेक घेतोय असं सांगितलं असल्याने, या चर्चांवर पूर्णविराम पडलाय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

टॅग्स :विक्रांत मेसीबॉलिवूड