Join us

अभिनेते सईद जाफरी काळाच्या पडद्याआड

By admin | Updated: November 17, 2015 03:32 IST

गांधी, शतरंंज के खिलाडी यांसारख्या शंभरहून अधिक चित्रपटांतून अभिनयाचा वेगळा ठसा उमटविणारे चरित्र अभिनेते सईद जाफरी (८६) यांचे येथे निधन झाले. त्यांची पुतणी शाहीन

लंडन : गांधी, शतरंंज के खिलाडी यांसारख्या शंभरहून अधिक चित्रपटांतून अभिनयाचा वेगळा ठसा उमटविणारे चरित्र अभिनेते सईद जाफरी (८६) यांचे येथे निधन झाले. त्यांची पुतणी शाहीन अग्रवाल यांनी फेसबुकच्या माध्यमातून ही माहिती दिली. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी लंडनमध्येच अंत्यसंस्कार होतील. जुन्या काळातील प्रतिभावान कलाकारांपैकी एक असलेल्या सईद जाफरी यांनी आपल्या करियरची सुरुवात आकाशवाणीपासून केली. त्यानंतर त्यांनी कॅथॉलिक युनिव्हर्सिटी आॅफ अमेरिका येथून नाट्यशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला. शेक्सपिअरची नाटकं घेऊन अमेरिकेत जाणारे ते पहिले भारतीय होते. याचदरम्यान त्यांचा विवाह मधुर जाफरी यांच्याशी झाला. माय ब्युटीफुल लांद्रेट, सत्यजित रे यांचा शतरंज के खिलाडी हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट होते. बॉलीवूडमध्ये सईद जाफरी यांच्या निवडक चित्रपटांमध्ये चश्मेबद्दूर, मासूम, किसी से ना कहना, मंडी, मशाल, राम तेरी गंगा मैली, राम लखन, अजूबा आणि हीनासारख्या चित्रपटांचा समावेश आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर जाफरी यांनी शॉ कॉनरी, मायकल कॅनी, रोशन सेठ, जेम्स आइवरी, रिचर्ड एटनबरो आणि डेनियल डे -लुईस यांच्यासारख्या दिग्गजांसोबत काम केले होते. तर डेथ आॅन द नील, स्फिनिक्स, द ज्वैल इन द क्राऊन, ए पॅसेज टू इंडिया, आफ्टर मिडनाईट या त्यांच्या चित्रपटांचे विशेष कौतुक झाले. ओबीई अर्थात आॅर्डर आॅफ द ब्रिटिश एंपायर प्रदान करण्यात आलेले ते पहिले भारतीय होत. नाट्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल हा सन्मान देण्यात आला होता.दिग्दर्शक शेखर कपूर यांनी ट्विट केले आहे की, जाफरी हे एक दयाळू व्यक्तिमत्त्व होते. शेखर कपूर यांनी आपल्या पहिल्या चित्रपटात मासूममध्ये जाफरी यांच्यासोबत काम केले होते.शाहीन यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या संदेशात म्हटले आहे की, जाफरी यांची एक पिढी काळाच्या पडद्याआड गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, सईद जाफरी हे एक बहुआयामी अभिनेते होते. त्यांचा स्वभाव आणि त्यांच्या प्रतिभेसाठी नेहमीच त्यांची आठवण येत राहील.