Join us  

"माझे वडील कट्टर काँग्रेसचे, मी कट्टर शिवसेनेवाला होतो, पण..."; नाना पुन्हा भाजपावर बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 12:49 PM

जो कुणी छान काम करतो त्याला नमस्कार करायचा. फक्त त्यांच्याकडे वैयक्तिक स्वत:साठी काहीही मागायचे नाही असं नाना पाटेकरांनी म्हटलं.

मुंबई - माझे वडील काँग्रेसचे होते, मी कट्टर शिवसेनेवाला होतो पण आता भाजपा काहीतरी छान करेल अशी मला खात्री आहे असं सांगत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी पुन्हा एकदा भाजपाचं कौतुक केले आहे. त्याचसोबत येत्या काळात राजकारणात प्रवेश करणार का यावर प्रश्नावरही नाना पाटेकरांनी स्पष्ट उत्तर दिले. 

महाराष्ट्रातील असे कुठले ५ प्रश्न आहेत जे तात्काळ सोडवले पाहिजेत असा प्रश्न पत्रकाराने नाना पाटेकरांना विचारला. त्यावर नाना म्हणाले की, केवळ ५ नाहीत तर असे खूप प्रश्न आहे. आपण फक्त राजकारणावर बोलू नये. एवढ्यासाठी की मी मग परखडपणे बोलेल. पुन्हा त्यावर वाद होतो. मी कुठल्याही पक्षाचा नाही. माझे वडील कट्टर काँग्रेसवादी होते. मी कट्टर शिवसेनेवाला होतो. आज भाजपा खूप काहीतरी छान करेल याची खात्री वाटते. नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस ज्यारितीने काम करतायेत ते मला आवडते. नितीन गडकरी मुद्देसूद बोलतायेत. कोण काय बोलेल यापेक्षा आपले काम प्रामाणिकपणे करणे यासाठी गडकरी हे मोठे उदाहरण आहे. अजात शत्रू असलेला तो माणूस आहे. विरोधी पक्षातील आणि त्यांच्या पक्षातील सर्वच मंडळींना ते हवेहवेसे वाटतात. हा सगळ्यात मोठा गुण आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच जो कुणी छान काम करतो त्याला नमस्कार करायचा. फक्त त्यांच्याकडे वैयक्तिक स्वत:साठी काहीही मागायचे नाही. मग तुमची मैत्री टिकून राहते. राजकारण माझा प्रांत नाही. मी तिथे जराही टीकू शकणार नाही. आज बाहेर असल्याने तुम्हाला तुमची मते मांडता येतात. तिथे गेल्यानंतर तुमच्या मताला कितपत किंमत असेल हे माहिती नाही असं सांगत नाना पाटेकर यांनी राजकारणात येण्याबाबतच्या प्रश्नाला स्पष्ट उत्तर दिले. टीव्ही ९ ने त्यांची ही मुलाखत घेतली त्यात नाना पाटेकर बोलले. 

दरम्यान, याआधीही एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी भाजपावर अंदाज वर्तवला होता. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका आहेत. त्या निवडणुकीबाबत तुम्ही काय पाहता? या प्रश्नावर नानांनी तू बघ, किती मोठ्या प्रमाणात भाजपा जिंकेल. आता ती कुठे जिंकेल, कसं जिंकेल हे पाहावं, भाजपाशिवाय दुसरा पर्याय नाही. इतके चांगले काम सुरू आहे. त्यामुळे ३५०-३७५ जागा भाजपा जिंकल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. मोदींमुळे आपल्या भारताची प्रतिमा जगभरात उंचावली त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे असं नानांनी नरेंद्र मोदींचं कौतुक केले होते. 

त्याचसोबत मी नकारात्मक गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. मध्यंतरी काहीजण मला तुम्ही मोदीभक्त झालात असं बोलत होते. अरे, त्यांनी काम चांगले केले तर चांगलेच बोलावे लागेल.मग तुम्ही मोदीभक्त म्हणाल तरी चालेल. मी कुठल्याही पक्षाचा नाही.जे चांगले आहे त्याला चांगले बोलणं आपण कधी सुरू करणार? जर तुम्हाला सर्वच वाईट दिसत असेल तर ते तुमच्यावर निर्भर आहे. मला जे योग्य वाटते ते मी करतो असं नाना पाटेकर यांनी खडसावून सांगितले होते. 

टॅग्स :नाना पाटेकरभाजपादेवेंद्र फडणवीसनरेंद्र मोदी