Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘नकळत सारे घडले’ने जमवली आनंद-श्वेताची जोडी; मराठी नाटकात प्रथमच दिसणार एकत्र

By संजय घावरे | Updated: May 28, 2024 19:48 IST

जुने ते सोने या उक्तीप्रमाणे वर्तमानात काही जुनी नाटके पुनरुज्जीवित करून नव्या संचात सादर केली जात आहेत.

मुंबई - आपल्या सहजसुंदर अभिनय शैलीने रसिकांवर मोहिनी घालत मनोरंजनाच्या सर्वच माध्यमांमध्ये मुशाफिरी करणाऱ्या अभिनेता आनंद इंगळेचे नवीन मराठी नाटक रंगभूमीवर येणार आहे. या नाटकात त्याच्या जोडीला डॉ. श्वेता पेंडसे आहे. या नाटकाच्या निमित्ताने दोघेही प्रथमच एकत्र आले आहेत.

जुने ते सोने या उक्तीप्रमाणे वर्तमानात काही जुनी नाटके पुनरुज्जीवित करून नव्या संचात सादर केली जात आहेत. या निमित्ताने आजच्या पिढीला क्लासिक नाटके पाहण्याची संधी मिळत आहे. या यादीत आता शेखर ढवळीकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘नकळत सारे घडले’ या नाटकाचा समावेश झाला आहे. नवनित प्रॉडक्शन्स निर्मित रूपकथा प्रकाशित ‘नकळत सारे घडले’ हे नव्या संचातील नाटक पुढल्या महिन्यापासून रंगभूमीवर दाखल होत आहे.

नाटकाचे निर्माते राहुल पेठे आणि नितीन भालचंद्र नाईक आहेत. आनंद इंगळे आणि डॉ. श्वेता पेंडसे या दोन मातब्बर कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी या नाटकाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. या दोघांसोबत प्रशांत केणी, तनिषा वर्दे आदि कलाकार आहेत. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. नेपथ्य राजन भिसे यांचे, तर प्रकाशयोजना शितल तळपदे यांची आहे. वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे.

प्रत्येक पिढीचे एक मत असते, एक दृष्टिकोन असतो. कोण बरोबर? कोण चूक? पिढ्यांमधल्या वाढलेल्या अंतराचा हा तिढा सोडवायचा तरी कसा? यावर भाष्य करत ‘नकळत सारे घडले’ मनोरंजक नाटक प्रत्येकालाच स्वतःकडे, विविध नाते संबंधांकडे आणि एकूणच आपल्या मूल्यव्यवस्थेकडे पहायची एक निराळी दृष्टी देते.