Join us

अभिनयातील क्वीन... कंगनाची राष्ट्रीय पुरस्कारांची ' हॅटट्रिक'

By admin | Updated: March 28, 2016 13:16 IST

फॅशन, क्वीन, तनू वेड्स मनू रिटर्न्स या प्रत्येक चित्रपटातून कंगनाने अभिनयांच खणखणीतपणे वाजवून स्वत:ची गुणवत्ता सिद्ध केली आहे.

मीनाक्षी कुलकर्णी
नवी दिल्ली, दि. २८ - फॅशन चित्रपटातील बेदरकार मॉडेल असो वा वो लम्हे चित्रपटातील अभिनेत्री सना अझीम अथवा क्वीन चित्रपटातील एकटीच आपल्या हनिमूनला जाणारी राणी... आपल्या खणखणीत अभिनयाने कंगना राणावतने प्रत्येक भूमिका अक्षरश: जिवंत केली. आणि तिच्या याच कष्टाचं फळ म्हणून तिला एक-दोनवेळा नव्हे तर तब्बल तीन वेळा 'राष्ट्रीय' पुरस्कार मिळाला आहे. 
अभिनेत्री बनण्याच्या ध्यासाने हिमाचल प्रदेशातील एका छोट्याशा गावातून दिल्लीत आलेल्या कंगनाने भरपूर स्ट्रगल केलंय. अभिनयाच्या क्षेत्रात जाण्याचा निर्णय मुळात तिच्या घरच्यांनाच मान्य नव्हता, त्यामुळे आपलं स्वप्न साध्य करण्यासाठी घरच्यांशी भांडून ती बाहेर पडली. मात्र अभिनेत्री बनण्याचा तिचा प्रवास सोप्पा निश्चितच नव्हता.. दिल्लीतील 'अस्मिता' थिएटर ग्रुपमध्ये दिग्दर्शक अरविंद गौर यांच्या मार्गदर्शनाखाली तिने अभिनयाचे धडे गिरवले आणि सुमारे दशकभरापूर्वी 'गँगस्टर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या पहिल्याच चित्रपटातील अभिनयाने तिने सर्वांनाच आपली दखल घ्यायला भाग पडली. त्यानंतर वो लम्हे, लाईफ इन ए मेट्रो, फॅशन, काईट्स, वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई अशा अनेक चित्रपटांमधील तिच्या भूमिका नावाजल्या गेल्या. 'फॅशन'मधील ड्रग्ज-अॅडिक्ट, बेदरकार, यशाच्या धुंदीत हरवलेल्या सोनाली गुजराल या मॉडेलचे व्यक्तिमत्व तिने पडद्यावर असे जिवंत केले की या चित्रपटासाठीच प्रियांका चोप्राला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असतानाच कंगनानेही सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला...!
 
 
त्यानंतर दोन वर्षापूर्वी आलेल्या 'क्वीन' चित्रपटातील साध्या सरळ पण खंबीर अशा राणीच्या भूमिकेत जीव ओतून तिने सर्वांनाच आपली दखल घ्यायला भाग पाडलं.. त्यावर्षीच्या एकूण एक पुरस्कारांवर नाव कोरणारी कंगना एकाही पुरस्कार सोहळ्याला हजर नव्हती मात्र सर्व सोहळ्यांवर तिची छाप उमटली होतीच. मात्र 'क्वीन'साठी राष्ट्रीय पुरस्कारामधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावून ती 'ए-लिस्ट' अभिनेत्रींच्या यादीत पोचली. 
कंगना ही तिच्या मनातलं बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहे, कोणताही आडपडदा न ठेवता तिने आपलं जीवन जगलं आहे. एकाहून एक यशस्वी चित्रपट देतानाच तिचे काही चित्रपट धाडकन आपटलेही, मात्र तिला त्याने फरक पडला नाही, कारण यशाच्या शिखरावर असतानाही तिचे पाय जमिनीवरंच होते. तिच्या अभिनयाप्रमाणेच तिची पर्सनल लाईफही बरीच चर्चेत होती. तिची प्रेमप्रकरणं असो वा बदलणारे बॉयफ्रेंड्स वा सध्या एका नामवंत अभिनेत्यासोबत सुरू असलेला तिचा वाद.. सगळंच जगजाहीर आहे... तिेनेही ते कधीच लपवलं नाही. कारण एका सेलिब्रिटीच्या आयुष्यात या सर्व फेज येतात आणि जातात, सेलिब्रिटींचं आयुष्य कधीच प्रायव्हेट नसतं हे तिला माहित आहे... पण त्याकडे लक्ष न देता आपलं काम चोखपणे करून त्याद्वारेचतून टीकाकारांना उत्तर देणं तिला महत्वाचं वाटतं आणि आत्तापर्यंत तिने तेच केलं आहे.  
फॅशन, क्वीन आणि आता ' तनू वेड्स मनू रिटर्न्स' या चित्रपटातील भूमिकेसाठी झालेलं कौतुक, मिळालेले पुरस्कार आणि आता तिस-यांदा ' राष्ट्रीय पुरस्काराची' उमटलेली मोहोर याद्वारे कंगनाने तिचं म्हणणं सिद्ध केलं आहे.