Saif Ali Khan Attack: अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्यावर हल्ला करणारा बांगलादेशी नागरिक शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर हा सुमारे सात महिन्यांपूर्वी मेघालयातील डावकी नदी ओलांडून भारतात आला होता आणि त्याने पश्चिम बंगालच्या रहिवाशाचे आधार कार्ड वापरून सिमकार्ड खरेदी केले होते. आता पोलिसांच्या चौकशीत आरोपीने सैफवरील हल्ल्याचे कारण सांगितले आहे. सैफच्या पाठीत चाकू खुपसल्याने तो गंभीर जखमी झाला होता. आठवड्याभराच्या उपचारानंतर रुग्णालयातून सैफ रुग्णालयातून घरी परतला आहे.
१५ जानेवारीच्या मध्यरात्री बांगलादेशी नागरिक असलेल्या आरोपीने अभिनेता सैफ अली खानवर घरात घुसून प्राणघातक हल्ला केला. सैफवर आरोपीने सहा वार करण्यात आले. त्यापैकी सर्वात गंभीर हल्ला हा सैफच्या पाठीच्या मणक्याजवळ करण्यात आला. हल्ल्यात चाकूचा तुकडा सैफच्या पाठीत अडकून पडला होता. सुरुवातीला चोरट्याने सैफवर इतक्या तीव्रतेने हल्ला कसा केला असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पोलीस चौकशीत आरोपी याबद्दलचा खुलासा केला आहे. आरोपी हा राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू असल्याचे पोलीस तपासातून समोर आलं आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ अली खानने झटापटीच्या वेळी आरोपीला समोरून घट्ट पकडून ठेवल्यामुळे त्याने अभिनेत्याला भोसकले. चोरीच्या इराद्याने सैफच्या घरात घुसलेल्या बांगलादेशी घुसखोराने भोसकल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. बांगलादेशी नागरिकाने पोलिसांना सांगितले की सैफच्या मजबूत पकडीतून स्वतःला सोडवण्यासाठी त्याने अभिनेत्याच्या पाठीवर अनेक वेळा वार केले. हल्ल्यानंतर आरोपी वांद्रे सैफच्या फ्लॅटमधून पळून गेला आणि सुमारे दोन तास इमारतीच्या बागेत लपून बसला होता.
"आरोपीने सतगुरु शरण बिल्डिंगमधील अभिनेत्याच्या फ्लॅटमध्ये बाथरूमच्या खिडकीतून चोरीच्या उद्देशाने प्रवेश केला होता. घरात प्रवेश केल्यानंतर अभिनेत्याच्या कर्मचाऱ्यांनी त्याला पाहिले आणि त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही वेळातच सैफ अली खान तेथे आला आणि धोका ओळखून त्याने आरोपीला समोरून घट्ट पकडले. आरोपीला हालचाल करण्यास वेळ न मिळाल्याने त्याने स्वत:ला त्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी अभिनेत्याच्या पाठीवर चाकूने वार केले. या हल्ल्यात खान जखमी झाला आणि आरोपी त्याच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाला," अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी सांगितले की, हल्ल्यानंतर घुसखोर खान यांच्या फ्लॅटमधून पळून गेला आणि एका इमारतीच्या बागेत सुमारे दोन तास लपून राहिला. या हल्ल्यात सैफला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर हा ३० वर्षीय बांगलादेशी नागरिक आहे. त्याला पोलिसांनी रविवारी अनेक ठिकाणी शोध घेतल्यानंतर अटक केली. रविवारी मुंबई न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.