आमिर खान हा बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. आमिर नवोदित कलाकारांच्या सिनेमांना सपोर्ट करण्यासाठी कायम हजर असतो. अशातच आमिर 'इलू इलू' या आगामी मराठी सिनेमाच्या प्रिमियरला उपस्थित होता. आमिरच्या उपस्थितीने सर्वच कलाकारांना हुरुप आला. आमिरने सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत सिनेमा पाहिला. इतकंच नव्हे तर सिनेमा पाहून खास प्रतिक्रिया दिली.
आमिरची 'इलू इलू' सिनेमा पाहून प्रतिक्रिया
आमिर 'इलू इलू' सिनेमा पाहून दिग्दर्शकाच्या खांद्यावर हात ठेऊन कौतुक करत म्हणाला की, "हा इलू इलू सिनेमा अजिंक्यने बनवलाय. मी दोन वर्षापूर्वी हा सिनेमा पाहिलेला. मला हा सिनेमा खूप आवडलेला. माझा पूर्ण प्रयत्न होता की, मी या फिल्मसोबत जोडला जाईल. पण मधल्या काळात मी व्यस्त होतो. या सिनेमाची सुंदर कहाणी आणि कलाकारांचा परफॉर्मन्स सुद्धा चांगलाय. अजिंक्यचा पहिलाच सिनेमा आहे हा सुखद धक्का आहे."
अजिंक्यचं आडनाव फाळके आहे त्यामुळे चित्रपटसृष्टीची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या दादासाहेब फाळके यांच्याशी अजिंक्यचं काय नातं आहे का? असं आमिरने त्याला विचारलं. "माझे काही नातेवाईक फाळकेंशी संबंधित आहेत", असं अजिंक्य म्हणाला. हे ऐकताच आमिर म्हणाला, "फाळकेंचा काहीतरी खास गुण अजिंक्यमध्ये आहे. हा सिनेमा दोन दिवसात रिलीज होतोय. तु्म्ही नक्की पाहा. खूप स्पेशल आणि मनोरंजन करणारा सिनेमा आहे. मला तर खूप मजा आली. त्यामुळे अजिंक्यला आणि त्याच्या संपूर्ण टीमला माझे खूप आशीर्वाद"