बॉलिवूडच्या पडद्याने लव्ह अॅण्ड रोमान्सचे अनेक मानदंड स्थापित केले. पण, बॉलिवूडच्या जगात वावरणाऱ्या अनेकांना वास्तव आयुष्यात मात्र प्रेमात अपयश पाहावे लागले. मावळत्या वर्षांत अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींचे आयुष्य ब्रेकअप वळणावर पोहोचले आणि संपले. या वर्षात अनेक सेलिब्रेटींचे घटस्फोटही झालेत. त्यामुळे ‘घटस्फोटांचे वर्ष’असेच २०१६चे वर्णन करावे लागेल. फरहान अख्तर, करिश्मा कपूर, मलायका-अरबाज, पुलकित सम्राट अशा अनेक सिनेस्टार्सचे संसार या वर्षात मोडले. यावर एक नजर...अरबाज खान आणि मलायका खानअरबाज खान आणि त्याची हॉट अॅण्ड हॉटेस्ट पत्नी मलायका अरोरा खान या जोडीने या वर्षांत परस्परांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. खरे तर अरबाज आणि मलायका या दोघांकडे बॉलिवूडचे आदर्श कपल म्हणून पाहिले जात होते. पण, जानेवारीअखेर अरबाज आणि मलायका यांनी त्यांचे १७ वर्षे जुने संपवण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्या कानावर पडू लागल्या. मार्चच्या अखेरपर्यंत त्यांनी यावर मौन बाळगले होते. मात्र, शेवटी अरबाजनेच आम्ही वेगळ झालो असल्याची कबुली दिली. पाच वर्षे एकमेंकाच्या प्रेमात अखंड बुडाल्यानंतर १२ डिसेंबर १९९८ रोजी मलायका व अरबाज लग्नाच्या बंधनात अडकले होते. १८ वर्षांमध्ये या दोघांमध्ये खटके उडाल्याचे ऐकिवात नव्हते. अलीकडे ते दोघे पॉवर कपल या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करीत होते; मात्र जेमतेम तीन भागच ते एकत्र होते. शोसाठी येताना दोघेही वेगवेगळ्या गाडीतून येत असत. अखेर या दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. सध्या कौटुंबिक न्यायालयात या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे.पुलकित सम्राट-श्वेता रोहिराअभिनेता पुलकित सम्राट आणि श्वेता रोहिरा या दोघांचा संसार या वर्षांत संपुष्टात आला. श्वेता ही सलमान खानची मानलेली बहीण आहे. या दोघांच्या विभक्त होण्यामागे अभिनेत्री यामी गौतम कारणीभूत असल्याचे मानले गेले. खुद्द श्वेताने यामीला ‘घर तोडनेवाली’ असे म्हटले होते.हिमेश रेशमिया-कोमलम्युझिक कम्पोझर, सिंगर आणि अॅक्टर हिमेश रेशमिया आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेणार असल्याची बातमीही काही दिवसांपूर्वीच आली. या दोघांच्या लग्नाला २२ वर्षे झाली आहेत. गत ६ डिसेंबरला या दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला असल्याची बातमी आली. या दोघांना एक मुलगा आहे.फरहान अख्तर-अधुना भाबानीअभिनेता फरहान अख्तर आणि हेअर स्टायलिस्ट अधुना भाबानी यांनीही लग्नाच्या १६ वर्षांनंतर आपापल्या वाटा वेगळ्या करण्याचा निर्णय घेतला. या वर्षी दोघांनीही एकमेकांच्या संमतीने घटस्फोट घेतला. या घटस्फोटामागचे नेमके कारण अद्यापही समोर आलेले नाही. पण, अभिनेत्री अदिती राव हैदरीमुळे दोघांमध्ये दुरावा आल्याची चर्चा मध्यंतरी रंगली. अर्थात, अदिती व फरहान दोघांनीही याचा साफ शब्दांत इन्कार केला. यानंतर अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि फरहान या दोघांच्या अफेअरच्या चर्चाही बऱ्याच रंगल्या. फरहान व अधुना यांना दोन मुली आहेत.कॅटरिना कैफ-रणबीर कपूर२०१६च्या सुरुवातीला कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर या लव्ह बर्ड्सच्या ब्रेकअपची चर्चा कानावर आली. दोघांच्याही ब्रेकअपची बातमी त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. दीपिका पदुकोण हिच्यासोबतच्या ब्रेकअपनंतर रणबीर कॅटरिनाच्या प्रेमात पडला होता. काही वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ते लिव्ह-इनमध्ये राहू लागले होते; पण उणेपुरे सहा महिने लिव्ह इनमध्ये राहिलेल्या या जोडप्याच्या रिलेशनशिपचा शेवट ब्रेकअपमध्ये झाली. अर्थात, कॅटरिना माझ्या आयुष्यातील सगळ्यात सच्ची आणि प्रेरणादायी व्यक्ती आहे, असे रणबीर म्हणाला.सुशांत सिंह राजपूत-अंकिता लोखंडेसन २००९मध्ये ‘पवित्र रिश्ता’च्या सेटवर सुशांत आणि अंकिता या दोघांमध्ये प्रेम फुलले होते. यानंतर ‘काई पो छे’ या चित्रपटाद्वारे सुशांतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सहा वर्षांच्या अफेअरनंतर जानेवारी २०१६मध्ये सुशांतने अंकितासोबत लग्न करण्याची घोषणा केली होती. पण, त्यापूर्वीच या दोघांचे नाते संपुष्टात आले. सध्या सुशांतचे नाव अभिनेत्री क्रिती सेनॉनसोबत जोडले जात आहे.ओम पुरी-नंदिताया वर्षातच ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी आणि त्यांची पत्नी नंदिता यांच्याबद्दलही अशीच बातमी आली. दोघांनीही आपला २६ वर्षांचे वैवाहिक नाते संपवण्याचा निर्णय घेतल्याची बातमी आली. सध्या हे जोडपे विभक्त झालेय. अर्थात, कायदेशीररीत्या अद्यापही ते एकमेकांचे पती-पत्नी आहेत.
-रूपाली मुढोळकर