बॉलिवूडचा ‘खिलाडी’ म्हणजे अक्षय कुमार. अक्षय केवळ चित्रपटात वेगवेगळ्या व एकापेक्षा एक हटके भूमिकाच करीत नाही, तर चित्रपटात स्वत:च्या लूक्सबाबत वेगवेगळे प्रयोगही करतो. प्रत्येकवेळी काहीतरी हटके करण्याचाच त्याचा प्रयत्न असतो आणि यात तो यशस्वीही ठरतो. अक्षयचा ‘रुस्तम’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. ‘रुस्तम’मध्ये अक्षय नौदल अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. ‘रुस्तम’ असो, आगामी ‘ढिशूम’मधील कॅमिओ रोल असो किंवा ‘राउडी राठोड’ असो..आपल्या सगळ्यांच चित्रपटात अक्षय वेगवेगळ्या अवतारात दिसतो आणि प्रेक्षकांना भावतो. अक्षयचे दहा सगळ्यात लोकप्रिय आणि हटके लूक्स आम्ही आपल्या समोर ठेवत आहोत. या प्रत्येक चित्रपटांत अक्षयने एकापेक्षा एक हटके लूक्स ट्राय केले आणि ते प्रेक्षकांनाही जाम आवडले.भूलभुलय्या‘भूलभुलय्या’ या चित्रपटात अक्षयने शास्त्रज्ञ साकारला आहे. पांढऱ्या फ्रेमचा चष्मा असलेल्या अवतारात त्याने साकारलेला शास्त्रज्ञ अगदीच परफेक्ट म्हणायला हवा.सिंग इज किंग‘सिंग इज किंग’मधील डोक्यावर पगडी बांधलेला सिंग अवतारातील अक्षय सगळ्यांनाच जाम भावला. इतका की यानंतर ‘सिंग इज ब्लिंग’मध्येही तो याच अवतारात दिसला. सिंग अवतारात सर्वाधिक शोभेल असा अॅक्टर कोण तर निश्चितपणे अक्षय याचाच चेहरा आपल्या डोळ्यांपुढे येईल.जॉली एलएलबी‘जॉली एलएलबी’चा येऊ घातलेला सिक्वेल म्हणजे ‘जॉली एलएलबी2’. या चित्रपटात अक्षय वकिलाची भूमिका साकारणार आहे. जाड मिशी, माथ्यावर लाल टिळा, चोपून चापून केलेला भांग या लूक्समध्ये अक्षय अगदी परफेक्ट वकील शोभतो.राउडी राठोड ‘राउडी राठोड' हा तेलगू चित्रपट 'विक्रमारकुडु'चा हिंदी रि-मेक. यात अक्षयने डबल रोल साकारला आहे. एकीकडे आपल्या मिशांवर जिवापाड पे्रम व गर्व असणारा कर्तव्यदक्ष, शूर इन्स्पेक्टर विक्रम राठोड आणि दुसरीकडे शिव नामक चोर, हे दोन्ही कॅरेक्टर अक्षयने लीलया साकारले. यातील पिळदार मिशा असलेल्या अक्षयला नक्कीच तोड नाही.वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा’ या चित्रपटात अक्षयने गुरूची हत्या करून साम्राज्य मिळविणारा अंडरवर्ल्ड डॉन साकारला आहे. लांब कॉलरचे शर्ट, मिशी आणि डोळ्यांना काळा गॉगल असा काहीसा अहंकारी डॉन अक्षयने यात साकारला आहे.एअरलिफ्ट‘एअरलिफ्ट’मध्ये अक्षयने रणजित कट्याल या बिझनेसमॅनची भूमिका साकारली आहे. संकटकाळात कुवैतमधील भारतीयांना मायदेशी परत आणण्याची जबाबदारी पेलणारा रणजित अक्षयने सक्षमपणे पडद्यावर साकारला. आखूड केस आणि दाढीचे वाढलेले खुंट अशा लूक्समधील अक्षय या भूमिकेत भाव खाऊन गेला.गब्बर इज बॅकसमाजातील भ्रष्टाचारासारखा मुद्दा निखंदून काढण्यासाठी झटणारा एक सामान्य नागरिक अक्षयने यात साकारला आहे. सडपातळ, दाढी वाढवलेला अक्षय या रोलमध्ये अगदी फिट बसतो. त्याचे हे लूक्स पाहून हा अभिनेता इतक्या सहजपणे सर्वच भूमिकेत फिट कसा बसतो, हाच प्रश्न पडतो.रोबोट 2.0‘रोबोट 2.0’मध्ये अक्षय सुपरस्टार रजनीकांत यांच्या अपोझिट रोलमध्ये दिसणार आहे. यात अक्षय पहिल्यांदा विलेन अर्थात खलनायक साकारणार आहे. निश्चितपणे यातील त्याचे लूक ही युनिक असेच आहे.ढिशूमवरुण धवन व जॉन अब्राहमच्या आगामी ‘ढिशूम’ या चित्रपटात अक्षय लहानशी भूमिका करतो आहे. पण, सिनेमातील त्याचा लूक कमालीचा आकर्षक आहे. केसाचा बुचडा बांधलेल्या अंदाजात समुद्रात जेट स्कीवर स्वार असलेला अक्षय यात दिसणार आहे.
- rupali.mudholkar@lokmat.com