-किरण शिंदे, पुणे पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे यांचा छळ आणि मृत्यू प्रकरण सध्या राज्यभर गाजत असतानाच, प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनीही या घटनेबद्दल संताप अनावर झाला. त्यांनी एक संतप्त पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले असून, फेसबुकवर सध्या तिची जोरदार चर्चा सुरू आहे. (Pravin Tarde Post on Vaishnavi Hagawane Case)
प्रवीण तरडे काय म्हणाले?
तरडे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "हुंड्याच्या पैशांमधून उभारलेली घरंदारं प्रॉपर्टी पेटवून द्या. कुणा बहिणीचा असा छळ चालू असेल तर पुढे येऊन बोला... समाज म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत."
त्यांनी या शब्दांमधून केवळ संतापच नव्हे तर समाजातल्या महिलांवरील अत्याचाराविरोधात उभं राहण्याची निकडही प्रकर्षाने व्यक्त केली आहे.
छळवणुकी विरोधात ठाम भूमिका
तरडे यांनी आपल्या पोस्टद्वारे समाजातील अशा घटनांवर फक्त भाष्य न करता, त्याविरुद्ध उघडपणे उभं राहण्याचे आवाहन केलं आहे. “कुणा बहिणींचा असा छळ सुरू असेल तर पुढे या, आम्ही तुमच्या सोबत आहोत,” असा ठाम संदेश त्यांनी दिला आहे.
फेसबुकवरील या पोस्टनंतर हजारो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी प्रवीण तरडे यांच्या धाडसी भूमिकेचं स्वागत केलं असून, “हुंडाबळी” विरोधात उघडपणे आवाज उठवण्याची ही गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण
वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू आणि त्यामागील हुंड्यामुळे झालेला छळ – या प्रकरणाने राज्यात खळबळ माजवली आहे. पोलिस तपास सुरू असून, आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी प्रमुख आरोपी असलेला राजेंद्र हगवणे सध्या फरार आहे. तर राजेंद्र हगवण्याची पत्नी मुलगा आणि मुलगी त्यांना अटक करण्यात आली आहे.