- प्रसाद गो. जोशी
अमेरिकेच्या वाढीव टॅरिफची अंमलबजावणी आगामी सप्ताहात सुरू होणार असल्याने भारतीय बाजारावर विक्रीचा दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे. परकीय वित्तसंस्थाही विक्रीचा जोर लावू शकतात. महिन्याचा शेवटचा सप्ताह असल्याने सौदापूर्तीमुळेही बाजारात दबाव राहू शकतो.
गतसप्ताहात बाजारात अपेक्षित वाढ झाली होती आणि मिडकॅप-स्मॉलकॅप निर्देशांकही मजबूत राहिले. सेन्सेक्स ७०९.१९ अंशांनी वाढून ८१,३०६.८५ अंशांवर, तर निफ्टी २३८.८० अंशांनी वाढून २४,८७०.१० अंशांवर बंद झाला. मात्र, या सप्ताहात विक्रीच्या दबावामुळे बाजार खाली येण्याची शक्यता आहे.
अमेरिकेत व्याजदर कपातीच्या संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी आली, तर डॉलर निर्देशांक कमजोर झाला. परंतु धोरणातील अनिश्चिततेमुळे परकीय वित्तसंस्थांनी विक्रीचा पवित्रा घेतला असून आगामी सप्ताहातही विक्री होण्याची शक्यता आहे. भारतात जीएसटी दर फेररचनेमुळे देशात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे भारतीय कंपन्यांना मागणी वाढण्याची अपेक्षा आहे.
आठ लाख कोटींपेक्षा अधिक भांडवलात वाढ
भारतीय शेअर बाजारामध्ये गतसप्ताहात झालेल्या वाढीमुळे गुंतवणूकदारांच्या भांडवलामध्ये आठ लाख कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली आहे.
मागील सप्ताहाच्या अखेरीस बाजारातील नोंदणीकृत सर्व कंपन्यांचे बाजार भांडवलमूल्य चार कोटी ४४ लाख ७८ हजार ६११.२७ कोटी रुपये होते. त्यामध्ये वाढ होऊन ते चार कोटी ५३ लाख ६५ हजार ७२३.८३ कोटी रुपये झाले.
याचाच अर्थ एका सप्ताहामध्ये गुंतवणूकदार आठ लाख ८७ हजार ११२.८६ कोटी रुपयांनी श्रीमंत झाले आहेत.