महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकार अनेक स्कीम्स आणत असते. सरकारनं यापूर्वी महिलांसाठी महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट ही स्कीम आणली होती. या योजनेला उत्तम प्रतिसादही मिळाला होता. दरम्यान, महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी सरकारनं आणलेली 'महिला सन्मान बचत प्रमाणपत्र' ही सरकारी योजना ३१ मार्च २०२५ पासून अधिकृतपणे बंद करण्यात आली आहे. म्हणजेच आता या योजनेअंतर्गत कोणत्याही ठेवी किंवा गुंतवणूक स्वीकारली जाणार नाही. अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागानं (डीईए) २७ मार्च २०२५ च्या अधिकृत पत्राद्वारे 'महिला सन्मान बचत प्रमाणपत्र' (एमएसएससी) योजना ३१ मार्च २०२५ नंतर सुरू राहणार नाही, अशी अधिकृत घोषणा केली आहे.
'महिला सन्मान बचत प्रमाणपत्र' आता गुंतवणुकीसाठी बंद झाली आहे. दरम्यान, आता गुंतवणुकीसाठी दुसरी सरकारी योजना पाहावी लागणार आहे. तर ज्या महिलांनी या योजनेत गुंतवणूक केली आहे त्यांना ७.५% इतकं व्याज मिळणार आहे. परंतु आता नव्यानं या योजनेअंतर्गत कोणतंही खातं उघडता येणार नाही. या योजनेत गुंतवणुकीची किमान रक्कम १००० रुपये आणि जास्तीत जास्त गुंतवणूक २ लाख रुपये प्रति व्यक्ती होती. ही योजना केवळ महिला आणि मुलींसाठी सुरू करण्यात आली होती.
अक्षय्य तृतीयेला का महाग होतं सोनं? ही आहेत यामागची महत्त्वाची कारणं
आणखी कोणत्या योजनांमध्ये गुंतवणूक शक्य
आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणं ही योजना सरकारनं बंद केली आहे. आता यात कोणीही नवीन खातं उघडू शकत नाही, परंतु या योजनेव्यतिरिक्त आपण सरकारद्वारे चालविल्या जाणाऱ्या अन्य योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये (PPF) तुम्ही गुंतवणूक करू शकता. करमुक्त व्याज आणि १५ वर्षांच्या कालावधीची ही गुंतवणूक आहे. या योजनेत तुम्हाला ७.१% व्याज मिळतं. दुसरी योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना (SSY). मुलींसाठी तयार करण्यात आलेल्या या योजनेत जास्त व्याज दर आणि करसवलती देण्यात येत आहेत.