अशोक कारके, औरंगाबाद
मराठवाड्यात तीन वर्षांपासून दुष्काळजन्य स्थिती आहे. त्याचा परिणाम शेतीवर झाला असून, उसाची लागवड कमी झाल्यामुळे गेल्या वर्षी औरंगाबाद विभागातील ४८ साखर कारखान्यांपैकी फक्त १६ कारखाने सुरू होते. यावर्षी २१ कारखाने सुरू होणार असून, त्यांना ऊस टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. निवडणुका तोंडावर असल्यामुळे कारखानदार आणि संचालक मंडळ याकडे दुर्लक्ष करीत आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीने वातावरणात रंगत भरत आहे. निवडणुका तोंडावर आल्यामुळे कारखानदार आणि संचालक मंडळ कारखान्याला ऊस मिळेल का याची खात्री न करता फक्त विधानसभा निवडणुकीचे लक्ष डोळ्यासमोर ठेवून साखर कारखाने सुरू करण्याची लगबग करीत आहेत.
यावर्षी २१ साखर कारखाने सुरू होणार असल्याची नोंद प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे करण्यात आली आहे. २०१३-१४ मध्ये औरंगाबाद विभागात १,२४,४७०.४४ हेक्टर एवढे उसाचे क्षेत्र होते. १६ कारखान्यांच्या माध्यमातून त्यापैकी ७४०१५.१७ हेक्टर ऊस तोडला होता.
३८,४८,६५६ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. २०१३-१४ मध्ये ऊस कमी असल्यामुळे काही कारखाने सप्टेंबरमध्ये सुरू होऊन जानेवारीत बंद झाले होते. अशी स्थिती यंदाही होण्याची शक्यता आहे.
२०१४-१५ मध्ये विभागात उसाची लागवड १,०६,७३१.८२ हेक्टर झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १७,६३८.६८ हेक्टरने उसाचे क्षेत्र कमी झाले आहे. गेल्या वर्षी बंद असणारे पाच कारखाने यंदा सुरू होणार आहेत. यामुळे कारखाने जास्त आणि ऊस कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे. शासनाने १९ आॅगस्ट रोजी राज्यातील १२३ तालुक्यांत टंचाई परिस्थिती असल्याचे जाहीर केले आहे. त्यामध्ये मराठवाड्यातील ६४ टंचाईग्रस्त तालुक्यांचा समावेश आहे. १९ आॅगस्टच्या निर्णयात सुधारणा करून मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, बीड जिल्ह्यातील वडवणी, बीड आणि लातूरमधील रेणापूर तालुका टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केला आहे.
यंदा २१ कारखान्यांचे गाळप होणार, पण...
मराठवाड्यात तीन वर्षांपासून दुष्काळजन्य स्थिती आहे. त्याचा परिणाम शेतीवर झाला असून, उसाची लागवड कमी झाल्यामुळे गेल्या वर्षी औरंगाबाद विभागातील ४८ साखर कारखान्यांपैकी फक्त १६ कारखाने सुरू होते.
By admin | Updated: August 26, 2014 00:51 IST2014-08-26T00:45:11+5:302014-08-26T00:51:12+5:30
मराठवाड्यात तीन वर्षांपासून दुष्काळजन्य स्थिती आहे. त्याचा परिणाम शेतीवर झाला असून, उसाची लागवड कमी झाल्यामुळे गेल्या वर्षी औरंगाबाद विभागातील ४८ साखर कारखान्यांपैकी फक्त १६ कारखाने सुरू होते.
