बीडमध्ये महिलेवर अघोरी उपचार
By admin | Updated: September 6, 2014 00:19 IST2014-09-06T00:19:00+5:302014-09-06T00:19:00+5:30

बीडमध्ये महिलेवर अघोरी उपचार
>- मांत्रिकांकडून सहा महिन्यांपासून छळ अंबाजोगाई (बीड)- भानामती झाली असून दैवी शक्तीने भानामतीपासून मुक्त करतो, असे सांगत महिलेचा सहा महिने छळ केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील गडदेवाडी येथे घडली. दोघांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.अंबाजोगाई तालुक्यातील गडदेवाडी येथील शिवकांता मारोती खडके यांना, तुला भानामती झाल्याचे गावातील उत्तम हनुमंत गडदे व नामदेव रामा पवार यांनी सांगितले. आमच्यात दैवी शक्ती असून आम्ही तुझी भानामती दूर करतो, असे सांगून तिला तंबाखू व मिरचीची धुरी दिली. तिचे केस ओढून तिला मारहाण केली. अघोरी विद्येचा वापर करून तिला विविध औषधे पाजली. तिच्यावर लिंबू कापून ओवळून टाकले. विविध झाडपाल्यांचा वास दिला. मंतरलेले पाणी बळजबरीने पाजले. हा प्रकार गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने सुरूच आहे. या प्रकाराचा अतिरेक झाल्याने महिलेचा पती मारोती रखमाजी खडके यांनी ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. भानामती व जादू टोण्याचा वापर करणारे मांत्रिक उत्तम हनुमंत गडदे व नामदेव रामा पवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. (प्रतिनिधी)