नवी दिल्ली : अमेरिकेतील प्रख्यात बीटी बियाणे कंपनी मोन्सॅन्टोने आपले नवे वंश रूपांतरित (जीएम) कापसाचे नवे वाण भारतात सादर करण्याची योजना मागे घेतली आहे. नियामकीय अनिश्चिततेमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे कंपनीने म्हटले आहे.
मोन्सॅन्टो कंपनी बोलगार्ड या ब्रँड नावाने बीटी बियाणे बनविते. भारतात महिको कंपनीशी मोन्सॅन्टोचा करार आहे. बोलगार्ड-१ हे कपाशीचे बियाणे भारतात प्रसिद्ध झालेले आहे. बहुतांश शेतकरी आता हेच बियाणे सध्या वापरतात. हे बियाणे बोंड अळीला बळी पडत नाही. जीएम बियाण्याची प्रतिकार क्षमता ठरावीक वर्षांसाठीच असते, त्यानंतर हे बियाणे निष्प्रभ ठरू लागते. बोलगार्ड-१ आता या टप्प्यात आहे. काही ठिकाणी बोलगार्ड-१ कपाशीला बोंड अळीची बाधा झाल्याचे वृत्त आहे. नियोजित वेळापत्रकानुसार मोन्सॅन्टोने बोलगार्ड-२ विकसित केले आहे. ‘बोलगार्ड-२ राऊंडअप रेडी फ्लेक्स टेक्नॉलॉजी’ असे या बियाण्याचे संपूर्ण नाव असून, त्याच्या वापरास परवानगी मिळावी यासाठी मोन्सॅन्टोने भारत सरकारकडे पर्यावरण मंजुरी मागितली होती. तथापि, यासंबंधीचा अर्ज कंपनीने ६ जुलै रोजी परत घेतला आहे.
मोन्सॅन्टोच्या प्रवक्त्याने एका निवेदनात सांगितले की, व्यावसायिक आणि नियामकीय वातावरणाबाबत असलेल्या अनिश्चिततेमुळे कंपनीने नवे बियाणे भारतात सादर न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भारतात सध्या विकण्यात येत असलेल्या बियाणावर नव्या निर्णयाचा कोणताही परिणाम होणार नाही.
भारत सरकारने बीटी कापसाच्या बियाण्यासाठी भरमसाट परवाना शुल्क लावले असल्याचा कंपनीचा आरोप आहे. तसेच बीटी बियाणांच्या किमतीवर सरकारने घातलेली मर्यादाही कंपनीला पसंत नाही. बियाण्याबरोबर त्यासंबंधीचे तंत्रज्ञानही भारतीय भागीदार कंपनीला देण्यात यावे, असे बंधन भारत सरकारने विदेशी कंपन्यांना घातले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>बोलगार्ड-२ भारतात नाही
बीटी कापसासाठीच्या परवाना शुल्कात कपात न केल्यास भारतातील आपल्या व्यवसायाबाबत फेरविचार करण्याचा तसेच नवे बियाणे भारतात न आणण्याचा इशारा मोन्सॅन्टोने मार्च महिन्यातच दिला होता. तथापि, भारत सरकारने कंपनीला दाद दिली नव्हती. त्यामुळे कंपनीने बोलगार्ड-२ बियाणे भारतात न आणण्याचा निर्णय घेतला आहे.
कापसाचे नवे बीटी वाण आणणार नाही
बीटी बियाणे कंपनी मोन्सॅन्टोने आपले नवे वंश रूपांतरित (जीएम) कापसाचे नवे वाण भारतात सादर करण्याची योजना मागे घेतली
By admin | Updated: August 26, 2016 06:54 IST2016-08-26T06:54:33+5:302016-08-26T06:54:33+5:30
बीटी बियाणे कंपनी मोन्सॅन्टोने आपले नवे वंश रूपांतरित (जीएम) कापसाचे नवे वाण भारतात सादर करण्याची योजना मागे घेतली
