>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - जगातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप वापरणा-यांसाठी खुशखबर आहे. व्हॉट्सअॅपने 8 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवं ‘स्टेटस’ फीचर सुरू केलं होतं. मात्र, स्टेटस फिचर युजर्सना अजिबात आवडलं नव्ह्तं. अनेकांनी जुनंच स्टेटस फिचर पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती.
युजर्सकडून नकारात्मक प्रतिक्रिया येत असल्याने व्हॉट्सअॅपने आपलं जुनं स्टेटस फीचर पुन्हा आणलं आहे. व्हॉट्सअॅपच्या 2.14.95 बीटा व्हर्जनवर जुनं स्टेटस सुरू करण्यात आलं आहे. व्हॉट्सअॅप या स्टेटसची चाचणी घेत आहे. स्टेटस फीचरला नवं नाव देण्यात आलं असून 2.14.95 बीटा व्हर्जनवर About या नावाने हे स्टेटस उपलब्ध आहे.
जर तुम्ही बीटा युजर नसाल तरी तुम्ही 2.14.95 बीटा व्हर्जन अपडेट करु शकतात. पण लवकरच व्हॉट्सअॅप हे फीचर औपचारिकरित्याही अपडेट करणार आहे.
कसं वापराल-
नवं फीचर वापरण्यासाठी 2.14.95 बीटा व्हर्जनसाठी बीटा टेस्टर म्हणून नोंदणी करावी लागेल, त्यानंतर प्ले स्टोअरवर जाऊन बीटा व्हर्जन अपडेट करु शकता. त्यानंतर व्हॉट्सअॅप ओपन करून उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर टच करावं. त्यानंतर एक नवी विंडो ओपन होईल त्यामध्ये तुमचा प्रोफाइल फोटो, मोबाइल नंबर आणि जुनं स्टेटस About या नावाने दिसेल. जुन्या स्टेटसवर टच केल्यास तुम्हाला आधी वापरलेले सर्व जुने स्टेटसही दिसतील. स्टेटसवर टच करून तुम्ही आधीप्रमाणे नवं स्टेटस टाकू शकतात.