कुपोषित बालकाचे वजन १५ दिवसांत दीडपट वाढले
By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST2014-08-25T21:40:15+5:302014-08-25T21:40:15+5:30

कुपोषित बालकाचे वजन १५ दिवसांत दीडपट वाढले
>अक्कलकुवा (जि. नंदुरबार) : कुपोषण पुनर्वसन केंद्रात उपचार घेत असलेल्या विवेक अविनाश पाडवी (साडेतीन वर्ष) या बालकाचे वजन १५ दिवसांत दीडपटीपेक्षा अधिक वाढले आहे. एवढ्या जोमाने वजन वाढण्याचा हा विक्रम असल्याचे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे.पुनर्वसन केंद्रातील इतर पाच बालकांच्या वजनातही वाढ होत आहे. ग्रामीण रुग्णालयातील केंद्रात गेल्या १५ दिवसांपासून सहा कुपोषित बालकांवर उपचार सुरू आहेत. त्यात तालुक्यातील दुर्गम भागातील महुखाडी येथील विवेक अविनाश पाडवी हा साडेतीन वर्षांचा बालक ६ ऑगस्टला दाखल झाला. योग्य पौष्टिक आहार व उपचारांमुळे १५ दिवसांत त्याचे वजन ६.४६ किलोग्रॅमवरून आता तब्बल १०.८० किलोग्रॅम झाले. रोशन अजबसिंग वळवी (दीड वर्षे), दर्शना प्रल्हाद वसावे (दीड वर्षे), प्राची चंपालाल पाडवी (११ महिने), रिना स्वरुपसिंग तडवी (एक वर्ष) आणि प्रतिज्ञा सुरूपसिंग तडवी (४ वर्षे) यांच्यावर येथे उपचार सुरू आहेत. त्यांच्याही वजनात वाढ होत असल्याचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक तथा बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रताप चाटसे व वैद्यकीय अधिकारी विवेक बाळापुरे यांनी सांगितले. (वार्ताहर)