>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनातून बाद करण्यात आलेल्या नोटा मोजण्याचं काम अद्यापही सुरु असल्याची माहिती आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी दिली आहे. उर्जित पटेल संसदीय समितीसमोर हजर झाले होते तेव्हा त्यांनी ही माहिती दिली. संसदीय समितीसमोर हजर होण्याची ही त्यांची दुसरी वेळ होती. नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या नोटांची मोजणी अजूनही सुरु असून नेमक्या किती नोटा पुन्हा परत आल्या आहेत याची माहिती देण्यास आपण असमर्थ असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
स्थायी समितीच्या तीन तासांच्या प्रदिर्घ बैठकीत उर्जित पटेल यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. मात्र 8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीची घोषणा करत 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर, नेमक्या किती नोटा पुन्हा परत आल्या आहेत याची व्यवस्थित माहिती किंवा नंबर उर्जित पटेल यांनी दिला नसल्याचं एका अधिका-याने नाव न देण्याच्या अटीवर सांगितलं आहे.
आणखी वाचा
ज्येष्ठ काँग्रेस नेते एम विरप्पा मोईली या समितीचे अध्यक्ष आहेत. उर्जित पटेल यांनी नोटांची मोजणी अद्याप सुरु असल्याचं वारंवार सांगितलं. कोणतीही व्यवस्थित माहिती किंवा उत्तरं न दिल्यामुळे समितीमधील सदस्य नाराज झाले आहेत.
नोटाबंदीवर समिती आपला अहवाल संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सादर करणार आहे, तसंच उर्जित पटेल यांनी पुन्हा या मुद्द्यावर चर्चा किंवा माहिती घेण्यासाठी बोलावण्यात येणार नाही अशी माहिती विरप्पा मोईली यांनी दिली आहे. 17 जुलैपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असून 1 जुलै रोजी संपणार आहे.
"आमची नोटाबंदीसहित अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. नोटाबंदी निर्णयावर बोलण्यासाठी पुन्हा आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांना बोलावण्यात येणार नाही", असं मोईली यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं आहे.
8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदी निर्णय जाहीर करण्यात आल्यापासून उर्जित पटेल दुस-यांदा समितीसमोर हजर झाले. जानेवारी महिन्यातही उर्जित पटेल समितीसमोर हजर झाले होते. त्यावेळी किती नोटा जमा झाल्या आहेत यासंबंधी आपण स्टेटमेंट देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर विरोधकांनी निर्णयावर टीका करत केंद्र सरकारला धारेवर धरलं होतं.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंगदेखील या बैठकीला उपस्थित होते. मात्र त्यांनी आरबीआय गव्हर्नरला एकही प्रश्न विचारला नाही. उर्जित पटेल यांनी यावेळी नोटाबंदीदरम्यान बँक कर्मचा-यांचा सुट्ट्या रद्द करण्यात आल्या होता याबद्दल माहिती दिली. तसंच नोटा मोजण्यासाठी लागणा-या नवीन मशीन्स आणण्याकरिता टेंडरही काढण्यात आल्याचं सांगितलं.
यावेळी एका काँग्रेस सदस्याने आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांना मे 2019 पर्यंत तरी आकडेवारी देऊ शकाल का ? असा उपहासात्मक प्रश्न विचारला. 2019 मध्ये एनडीएचा कार्यकाळ संपत आहे.