मुंबई : स्थानिक संस्था कर (एलबीटी) न भरणाऱ्या थकबाकीदार व्यापाऱ्यांसाठी अभय योजना लागू करीत मूळ रक्कम भरणाऱ्यांना व्याज आणि दंडातून सूट देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला.
विहित कालमर्यादेत एलबीटी न भरणाऱ्या विविध महापालिकांमधील व्यापाऱ्यांच्या संघटनांनी आणलेल्या दबावाला सरकार बळी पडल्याचे स्पष्ट झाले. कर न भरणाऱ्या व्यापाऱ्यांकडून थकबाकीसह नियमानुसार व्याज आणि दंडाची रक्कम मिळाली असती तर एलबीटीमुळे आधीच उत्पन्नात घट झालेल्या महापालिकांना फायदा झाला असता; पण आजच्या निर्णयाने महापालिकांची ती आशादेखील संपली.
एलबीटी लागू असलेल्या सर्व महापालिकांमध्ये ही अभय योजना राबविली जाणार आहे. हा कर लागू झाल्यापासून ३१ मार्च २०१५पर्यंतच्या कालावधीतील कर रकमेसाठीच ती लागू असेल. अभय योजनेचा कालावधी १ जून ते ३१ जुलै २०१५ असा असेल. व्याज आणि दंड वाचविण्यासाठी व्यापाऱ्यांनी या कालावधीत थकबाकी भरणे अनिवार्य असेल. अभय योजनेच्या कालावधीत नोंदणी नसणाऱ्या व्यापाऱ्यांना नोंदणी करावी लागणार आहे.
तसेच अद्याप कोणतेही विवरण दाखल न केलेल्या व्यापाऱ्यांनी अभय योजनेच्या काळात विवरण दाखल करून संपूर्ण रकमेचा भरणा केल्यास व्याज आणि दंडाच्या आकारणीतून सूट देण्यात येणार आहे. संपूर्ण कर भरणा केल्यास निर्धारणेनंतर देय असणाऱ्या व्याज आणि दंडातूनही सूट देण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)
एलबीटी न भरणाऱ्या व्यापाऱ्यांचा दंड माफ!
स्थानिक संस्था कर (एलबीटी) न भरणाऱ्या थकबाकीदार व्यापाऱ्यांसाठी अभय योजना लागू करीत मूळ रक्कम भरणाऱ्यांना व्याज आणि दंडातून सूट
By admin | Updated: May 13, 2015 01:29 IST2015-05-13T01:29:54+5:302015-05-13T01:29:54+5:30
स्थानिक संस्था कर (एलबीटी) न भरणाऱ्या थकबाकीदार व्यापाऱ्यांसाठी अभय योजना लागू करीत मूळ रक्कम भरणाऱ्यांना व्याज आणि दंडातून सूट
