नवी दिल्ली : उद्योगपती विजय मल्ल्या यांनी जाणीवपूर्वक संपत्तीचा खुलासा केला नाही, असा दावा सोमवारी एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांनी सर्वोच्च न्यायालयात केला. मल्ल्या यांनी फेब्रुवारीत एका ब्रिटिश कंपनीकडून मिळालेल्या ४ कोटी डॉलरची माहितीही दिलेली नाही.
बँकांच्या समूहाकडून उपस्थित अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी न्या. कुरियन जोसेफ आणि न्या. आर. एफ. नरिमन यांच्या खंडपीठासमोर सांगितले की, मल्ल्या यांनी फेब्रुवारीत मिळालेल्या ४ कोटी डॉलरच्या रकमेबाबत खुलासा केला नाही. विशेष म्हणजे मल्ल्या यांनी याबाबत मार्चमध्ये माहिती दिली आहे. तर सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार अवमान प्रकरणी नोटीस जारी झाल्यानंतर मल्ल्या यांनी न्यायालयात हजर राहायला हवे.
तथापि, मल्ल्या यांना हजर राहण्याबाबत कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या वतीने मांडली जाणारी बाजू ऐकून घेण्यात येऊ नये.
विजय मल्ल्या यांच्या वतीने उपस्थित ज्येष्ठ वकील सी. एस. वैद्यनाथन यांनी सांगितले की, न्यायालयाने मागील आदेश परत घेण्याबाबत मल्ल्या यांनी याचिका दाखल केली आहे. मल्ल्या यांच्याकडून कोणताही अवमान झालेला नाही. संपत्ती जाहीर करण्याबाबत न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात आल्याचेही
त्यांनी सांगितले. दरम्यान, न्यायालयाने पहिला आदेश परत घ्यावा,
याबाबत मल्ल्या यांनी दाखल
केलेल्या याचिकेवर आपले उत्तर देण्यास खंडपीठाने अॅटर्नी जनरल यांना सांगितले. या प्रकरणी
पुढील सुनावणी २७ सप्टेंबरला होणार आहे.
यापूर्वी २५ जुलै रोजी न्यायालयाने बँक समूहांच्या याचिकेवर मल्ल्या यांना नोटीस जारी केली होती. या याचिकेत आरोप करण्यात आलेला आहे की, मल्ल्या यांनी आपल्या पूर्ण संपत्तीचा खुलासा केलेला नाही. यापूर्वी १४ जुलै रोजी रोहतगी यांनी असा दावा केला होता की, मल्ल्या यांनी सर्वोच्च न्यायालयात सीलबंद लिफाफ्यात आपल्या संपत्तीची चुकीची माहिती दिली आहे. अनेक बाबी यात लपविण्यात आल्या आहेत. यात २,५०० कोटी रुपयांच्या नकदी देवाणघेवाणीचाही समावेश आहे. हे न्यायालयाच्या अवमानाचे प्रकरण आहे, असेही यात म्हटले होते. अलीकडेच या बँकांच्या समूहाने आरोप केला होता की, मल्ल्या हे तपासात सहकार्य करत नाहीत. तसेच विदेशी संपत्तीचा खुलासा करत नाहीत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
विजय मल्ल्या यांनी मुद्दामच दडविली संपत्तीची माहिती!
उद्योगपती विजय मल्ल्या यांनी जाणीवपूर्वक संपत्तीचा खुलासा केला नाही, असा दावा सोमवारी एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांनी सर्वोच्च न्यायालयात केला.
By admin | Updated: August 30, 2016 05:00 IST2016-08-30T05:00:05+5:302016-08-30T05:00:05+5:30
उद्योगपती विजय मल्ल्या यांनी जाणीवपूर्वक संपत्तीचा खुलासा केला नाही, असा दावा सोमवारी एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांनी सर्वोच्च न्यायालयात केला.
