अकोला : विदर्भात तेलबिया पिकांचे क्षेत्र घटले असून, या क्षेत्रात वाढ होण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी या विद्यापीठाने भरघोस उत्पादन देणाऱ्या वाणांची निर्मिती केली आहे. यावर्षी पाऊस अल्प प्रमाणात झाल्याने अवर्षण स्थितीमध्ये येणाऱ्या विविध तेलवाणांसह करडी पिकाची शिफारस विद्यापीठाने केली आहे. या रबी हंगामात तेलबिया पिकांचे क्षेत्र वाढविण्यावर कृषी विभाग व कृषी शास्त्रज्ञांनी भर दिला आहे.
कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या पीकेव्ही पीक आणि करडी फिल्ड व्ह्यू हे तेलबिया पीक रबी हंगामात येणारे असून, अवर्षणप्रवण क्षेत्रासाठी हे एक चांगले पीक आहे. राज्यात या पिकाची पेरणी २.७ लाख हेक्टर क्षेत्रावर केली जात असून, यापासून १.६८ लाख मेट्रिक टन उत्पादन होत असल्याचा दावा कृषी शास्त्रज्ञांनी केला आहे. या पिकाची राज्यातील सरासरी उत्पादकता ६०६ किलो एवढी आहे. या पिकाची मुळं जमिनीत खोलवर जात असल्यामुळे, पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता या पिकात आहे.
दरम्यान, भुईमूग, तीळ, जवस, सूर्यफूल, करडी आणि सोयाबीन आदी पिकांना राज्यातील वातावरण पोषक असल्याने तीन वर्षांपूर्वीपर्यंत राज्यात जवळपास ४० लाख हेक्टर क्षेत्रावर या विविध तेलबिया पिकांचे उत्पादन घेतले जात होते; परंतु अचानक या क्षेत्रात घट झाली. राज्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढल्याने तेलबिया पिकांची उणीव भरू न काढण्याचा प्रयत्न झाला असला तरी, खाद्यतेलाची गरज असलेल्या भुईमूग व इतर वाणांच्या क्षेत्रामध्ये लक्षणीय घट झाली आहे.
तीन वर्षांपूर्वी राज्यात ७ लाख हेक्टर असलेले भुईमुगाचे क्षेत्र घसरू न दोन ते अडीच लाख हेक्टरच्या खाली आले आहे. सूर्यफुलाचे क्षेत्र २ लाख ६९ हेक्टर होते, तेही १ लाख हेक्टरवर आले आहे. करडीचे क्षेत्र दोन लाख हेक्टर होते, ते कमी झाले आहे. याचा परिणाम खाद्यतेलाच्या वाढणाऱ्या किमतींवर दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.