सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
भारतातून अन्य देशांत होणाऱ्या निर्यातीचा आलेख सातत्याने घसरत असला तरी परदेशी बाजारपेठांमध्ये भारतीय भाज्या आणि फळांच्या मागणीत सतत वाढ होत असून, त्यांच्या निर्यातीतही लक्षवेधी वाढ झाल्याचे शुभवर्तमान, वाणिज्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीतून समोर आले आहे.
वाणिज्य मंत्रालयाच्या सूत्रांनुसार अन्य वस्तूंच्या निर्यातीत ५ टक्क्यांहून थोडी अधिक घसरण आहे. मात्र भाज्या आणि फळांच्या निर्यातीत मात्र मार्च २0१५ च्या तुलनेत १४.१५ टक्क्यांची वाढ झाली आहे. यंदा मार्च महिन्यापर्यंत भारतातून भाजीपाला आणि फळांची २६.२२ कोटी डॉलर्सची निर्यात झाली. गतवर्षीच्या मार्चमध्ये याच सुमारास भाजीपाला आणि फळांची निर्यात २२.९७ कोटी डॉलर्सची होती.
भाजीपाला आणि फळांच्या उत्पादनात चीन पहिल्या तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. हवामानातील विविधतेमुळे भारतात विविध प्रकारची फळे आणि भाज्यांची वर्षभर उपलब्धता असते. राष्ट्रीय फलोत्पादन बोर्डानुसार २0१२-१३ साली भारतात फळांचे ८१.२८ दशलक्ष मेट्रिक टन तर विविध भाज्यांचे १६२.१९ दशलक्ष मेट्रिक टन उत्पादन होते. या काळात देशाच्या ६.९८ दशलक्ष हेक्टर्स क्षेत्रावर फळांचे तर ९.२१ दशलक्ष हेक्टर्स क्षेत्रावर भाजीपाल्याचे उत्पादन होत होते. गेल्या तीन वर्षांत त्यात सतत वाढ होते आहे.
अॅग्रीकल्चर अँड प्रोसेस्ड फुड प्रोडक्टस एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट अॅथॉरिटी (अॅपेडा)कडून मिळालेल्या माहितीनुसार भाजीपाल्यामधे भेंडी आणि आल्याच्या उत्पादनात जगात भारत प्रथम क्रमांकावर आहे तर कांदे, बटाटे, वांगी,फ्लॉवर, कोबीच्या उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. फलोत्पादनामधे भारतीय केळी (२२.0४ टक्के), पपई (४0.७४ टक्के) आंबे व पेरू (३२.६५ टक्के) ही फळे जागतिक उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहेत.
फळे व भाजीपाल्याच्या उत्पादनात सातत्याने वाढ होत असल्याने त्यांच्या निर्यातीचे भवितव्यही उजळले आहे. सन २0१४-१५ साली फळे आणि भाजीपाल्याची ७४७४.१४ कोटींची निर्यात भारताने केली. त्यात फळ निर्यातीचे प्रमाण २७७१.३२ कोटी आणि भाजीपाला निर्यातीचे प्रमाण ४७0२.७८ कोटी रूपयांचे होते.
> युरोपातून भाज्यांची वाढली मागणी
भारतातून निर्यात होणाऱ्या फळांमध्ये आंबे, अक्रोड, द्राक्षे, केळी, डाळिंब यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. भाजीपाल्याच्या निर्यातीत कांदे, बटाटे, भेंडी, कारली, हिरव्या मिरच्या, अळंबी (मशरूम) इत्यादींचे प्रमाण अधिक आहे. भारतातून फळे व भाजीपाल्याची निर्यात प्रामुख्याने इंग्लंड, नेदरलँड, मलेशिया, सौदी अरेबिया,श्रीलंका, नेपाळ व बांगला देश यांत होते. सध्या मध्य पूर्व व युरोपियन देशांमधे भारतीय भाजीपाल्याची, विशेषत: हिरव्या भाज्यांची मागणी वाढली आहे.
भाज्या-फळांची निर्यात वाढली
भारतातून अन्य देशांत होणाऱ्या निर्यातीचा आलेख सातत्याने घसरत असला तरी परदेशी बाजारपेठांमध्ये भारतीय भाज्या आणि फळांच्या मागणीत सतत वाढ होत असून
By admin | Updated: April 21, 2016 03:46 IST2016-04-21T03:46:47+5:302016-04-21T03:46:47+5:30
भारतातून अन्य देशांत होणाऱ्या निर्यातीचा आलेख सातत्याने घसरत असला तरी परदेशी बाजारपेठांमध्ये भारतीय भाज्या आणि फळांच्या मागणीत सतत वाढ होत असून
