Lokmat Money > बिझनेस न्यूज > व्यावसायिक शेतीने बिघडला जमिनीचा पोत!

व्यावसायिक शेतीने बिघडला जमिनीचा पोत!

देशात व्यावसायिक पीक पद्धतीचा वापर वाढला असून, शेतीमध्ये उत्पादन वाढीवर भर दिला जात आहे.

By admin | Updated: August 13, 2014 03:52 IST2014-08-13T03:52:57+5:302014-08-13T03:52:57+5:30

देशात व्यावसायिक पीक पद्धतीचा वापर वाढला असून, शेतीमध्ये उत्पादन वाढीवर भर दिला जात आहे.

Vapor land spoiled commercial farming! | व्यावसायिक शेतीने बिघडला जमिनीचा पोत!

व्यावसायिक शेतीने बिघडला जमिनीचा पोत!

अकोला : देशात व्यावसायिक पीक पद्धतीचा वापर वाढला असून, शेतीमध्ये उत्पादन वाढीवर भर दिला जात आहे. त्यासाठी विद्राव्य व सरळ खतांचा अशास्त्रीय वापर होत असल्याने शेतीची उत्पादनक्षमता वाढण्याऐवजी ढासळतच चालली असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय या अशास्त्रीय शेतीचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, व्यावसायिक शेती जमिनीची पोत कितपत शश्वत ठेवणार, या प्रश्नाने शास्त्रज्ञांना पछाडले आहे.
भारतात विविध पिके आणि फळांचे दरवर्षी ५५२ मिलियन टन उत्पादन घेतले जाते. त्यासाठी जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणात उपसा सुरू असून, त्यांची परतफेड मात्र शून्य आहे. भरिस भर जास्त उत्पादनासाठी नायट्रोजनचा वापर वारेमाप होत आहे. याचे सर्वाधिक दुष्परिणाम मानवी आरोग्यावर होत असून, जमिनीची पोतही बिघडली आहे. यावर कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे मंथन सुरू असले, तरी व्यावसायिक शेतीची पाळेमुळे एवढी खोलवर रुजली की, त्याला आता प्रतिबंध घालणे कठीणच आहे. त्यामुळे शास्त्रज्ञापुढे हे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
जमिनीचे पृथक्करण व अन्नद्रव्यांचा विचार करूनच पीक पद्धती ठरवली जाते. अर्थात कोणती शेती, कोणत्या पिकास अनुकूल आहे, याचाही विचार केला जातो. तथापि, अलीकडे बहुतांश भागांमध्ये सर्वच प्रकारची पिके घेतली जात आहेत. परिणामी, विद्राव्य, खत आणि विविध रासायनिक किटकनाशकांचा वारेमाप वापर केला जात आहे. नत्र, स्फुरद व पालाश या खतांचा परिणाम डोळ्यांनी दिसत नाही. नायट्रोजनचे मात्र दृश्य परिणाम पिकांवर दिसू लागतात, उत्पादनात वाढ दिसून येते. म्हणूनच हरित क्रांतीच्या काळात नायट्रोजनचा वापर वाढला. या औषधाच्या वापरामुळे चार ते पाच वर्षे चांगले पीक घेता येते. त्यांनतर मात्र या रसायनाच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडून, उत्पादनक्षमता हळूहळू कमी होत जाते. नायट्रोजनच्या अतिवापरामुळे जमिनीचे संतुलन तर बिघडले आहेच, शिवाय मानवी आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. अशीच परिस्थिती यापुढेही राहिल्यास, त्याचे दीर्घ परिणाम पीक व आरोग्यावर होण्याची भीती असल्यामुळे कृषी विद्यापीठाचा मृद व जलसंधारण विभाग यासंदर्भातील ठोस संशोधनाची दिशा ठरविण्यात गुंतला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Vapor land spoiled commercial farming!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.