Lokmat Money > बिझनेस न्यूज > पर्वणी काळात प्रतिदिनी होणार दहा लाख लिटर दुधाचा वापर

पर्वणी काळात प्रतिदिनी होणार दहा लाख लिटर दुधाचा वापर

प्रशासन सतर्क : नियंत्रण शासकीय यंत्रणेकडेच

By admin | Updated: July 19, 2015 21:24 IST2015-07-19T21:24:28+5:302015-07-19T21:24:28+5:30

प्रशासन सतर्क : नियंत्रण शासकीय यंत्रणेकडेच

Use of one million liters of milk per day during the monsoon season | पर्वणी काळात प्रतिदिनी होणार दहा लाख लिटर दुधाचा वापर

पर्वणी काळात प्रतिदिनी होणार दहा लाख लिटर दुधाचा वापर

रशासन सतर्क : नियंत्रण शासकीय यंत्रणेकडेच
नाशिक : मागील सिंहस्थात साधूंना दूध पुरवण्याची जबाबदारी पेलणारी शासकीय दूध डेअरी आता बंद झाल्याने यंदा प्रशासनाने खासगी दूध व्यावसायिकांना सिंहस्थकाळात दुधाचा पुरेसा पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या असून, पर्वणी काळात रोजच्यापेक्षा तिप्पट म्हणजेच सुमारे दहा लाख ५० हजार लिटर दुधाची विक्री होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पर्वणीकाळात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. साधुग्राममधील साधूही साजूक तुपातील पदार्थ खाण्यालाच अधिक प्राधान्य देतात. त्यामुळे अस्सल पदार्थ पुरविण्याकडे व्यापार्‍यांचाही कल असतो. याशिवाय साधूही त्यांच्या प्रदेशातील व्यापार्‍यांकडून तूप आणि इतर पदार्थ मागवतात असा आजवरचा अनुभव आहे. असे असले तरी किमान दुधासाठी तरी साधूंना सिंहस्थनगरीवरच अवलंबून राहावे लागत असल्याने त्याचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नाशिक आणि त्र्यंबक येथील साधुग्राममध्ये दुग्ध विकास खात्यामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या विक्रेत्यांना स्टॉल देण्यात येणार असून, तेथूनच रास्त दरात दुधाचा पुरवठा केला जाणार आहे. यासाठी प्रादेशिक दुग्ध विकास अधिकारी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन सुरू आहे.
शहरात आजमितीस गोदावरी, राजहंस, अमूल आणि विकास या कंपन्यांमार्फत दुधाचा पुरवठा केला जातो. मागील सिंहस्थ काळात शासकीय दूध डेअरी असल्याने या कंपन्यांचा सहभाग तितकासा महत्त्वाचा नव्हता, परंतु यंदा शासकीय दूधच नसल्याने प्रशासनाला खासगी दूधविक्रेत्यांवरच अवलंबून राहावे लागणार आहे. दुधाचा दर्जा चांगला असावा यासाठी या प्रक्रियेत यंदा सहकारी दूध संघांना सहभाग देण्यात आला आहे. त्यामुळे या कंपन्यांना आवश्यक त्या सूचना देत प्रशासनाने साधुग्राममध्ये त्यांना जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दाखविली आहे. सध्या शहरात दररोज सुमारे तीन लाख ५० हजार दुधाचा वापर केला जातो. हाच वापर पर्वणी काळात प्रत्येक दिवशी तिप्पट होणार असल्याचा अंदाज प्रशासनाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नाशिक, संगमनेर तसेच प्रसंगी नगर आणि मुंबईहूनही दुधाची मागणी करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्वणीकाळात शहरात सुमारे दहा लाख ५० हजार लिटर दुधाची गरज लागणार आहे. त्याचा पुरवठा करण्याची सूचना संबंधित संस्थांना करण्यात आल्या आहेत.
दुधाची होणार तपासणी
दुधाचा पुरेसा पुरवठा तोही ठरावीक दर्जा आणि किमतीत होण्यासाठी सहकारी दूध संघांच्या उत्पादन प्रक्रियेवरही शासनाची नजर असेल. दुधाचे उत्पादन आणि पॅकिंग यावरही अन्न औषध प्रशासनाची नजर राहणार असून, दुधाचे पॅकिंग सक्षम अधिकार्‍यांच्या नजरेखालीच होणार आहे. याशिवाय दुधाची मागणी वाढल्याने संस्थांनी दुधाचे दर वाढवू नयेत यासाठीही सहकारी संस्थांना प्रशासनाने तंबी दिली असून, दुधाची विक्री करणार्‍या स्टॉलवर त्याच्या किमती लिहिणे क्रमप्राप्त असेल. याशिवाय वजन मापे विभागाचे नियंत्रकही यावर नजर ठेवून असतील. शहरात येणार्‍या भाविकांच्या संख्येचा अंदाज बांधून दुधाच्या पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
- एस. के. भुसनर (प्रादेशिक दुग्ध विकास अधिकारी, नाशिक.)

Web Title: Use of one million liters of milk per day during the monsoon season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.