Lokmat Money > बिझनेस न्यूज > अमेरिकेच्या सूतोवाचाने बाजार २६ हजारांच्या खाली

अमेरिकेच्या सूतोवाचाने बाजार २६ हजारांच्या खाली

अमेरिकेकडून व्याजदरामध्ये वाढ केली जाणार असल्याचे संकेत फेडरल रिझर्व्हच्या प्रमुखांनी पुन्हा दिल्यामुळे परकीय वित्तसंस्थांनी विक्रीचा धडाका लावला आहे.

By admin | Updated: December 6, 2015 22:32 IST2015-12-06T22:32:57+5:302015-12-06T22:32:57+5:30

अमेरिकेकडून व्याजदरामध्ये वाढ केली जाणार असल्याचे संकेत फेडरल रिझर्व्हच्या प्रमुखांनी पुन्हा दिल्यामुळे परकीय वित्तसंस्थांनी विक्रीचा धडाका लावला आहे.

The US market is below 26,000 level | अमेरिकेच्या सूतोवाचाने बाजार २६ हजारांच्या खाली

अमेरिकेच्या सूतोवाचाने बाजार २६ हजारांच्या खाली

अमेरिकेकडून व्याजदरामध्ये वाढ केली जाणार असल्याचे संकेत फेडरल रिझर्व्हच्या प्रमुखांनी पुन्हा दिल्यामुळे परकीय वित्तसंस्थांनी विक्रीचा धडाका लावला आहे. या जोडीलाच डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्याने दोन वर्षांतील गाठलेला तळ आणि भारतातील सेवा क्षेत्रामध्ये झालेली घट यामुळेही बाजार खाली आला. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक २६ हजारांच्याही खाली आल्याने गुंतवणूकदार धास्तावले.
मुंबई शेअर बाजारात गतसप्ताह हा मंदीवाल्यांचाच राहिला. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सप्ताहभरामध्ये ४९०.०९ म्हणजेच सुमारे दोन टक्क्यांनी घसरून २५,६३८.११ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) सुद्धा घसरला. यामध्ये सप्ताहाच्या अखेरीस १६०.८० अंशांनी घट होऊन ७७८१.९० अंशांवर बंद झाला.
संपलेला सप्ताह हा विविध देशांच्या बॅँकांचा होता, असे म्हणणेच सयुक्तिक ठरणारे आहे. सप्ताहाच्या प्रारंभीच भारतीय रिझर्व्ह बॅँकेने पतधोरणाचा द्वैमासिक आढावा घेताना सर्व महत्त्वाचे दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. युरोपियन सेंट्रल बॅँकेने आपले मदतीचे धोरण पुढे चालू ठेवतानाच व्याजदरामध्ये ०.१ टक्क्याने केलेल्या कपातीचा मात्र जगभरातील शेअर बाजारांवर विपरीत परिणाम झालेला दिसून आला. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या प्रमुख जेनेट येलेन यांनी अमेरिकन अर्थव्यवस्था आता सुधारत असल्याने व्याजदरात वाढ केली जाणार असल्याचे सूतोवाच पुन्हा केले. येलेन यांचे सूतोवाच मात्र भारतीय बाजाराच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे.
गेले काही महिने सातत्याने विक्री करीत असलेल्या परकीय वित्तसंस्थांनी गत सप्ताहातही आपला विक्रीचा धडाका कायम राखला. सप्ताहभरात या संस्थांनी भारतीय बाजारांमध्ये
२८२० कोटी रुपयांची विक्री केली आहे. या विक्रीमळे बाजार आणखी घसरला.
भारताच्या रुपयाची डॉलरच्या तुलनेत मोठी घसरण झालेली दिसून आली. परकीय वित्तसंस्थांच्या विक्रीमुळे परकीय चलनाची गंगाजळी कमी होत असतानाच डॉलरची मागणीही वाढती असल्यामुळे रुपयाचे मूल्य घसरून ६७ रुपयांवर पोहोचले. गेल्या दोन वर्षांमधील नीचांकी पातळी गाठल्यानंतर सप्ताहाच्या अखेरीस रुपयाचे मूल्य थोडे वाढून ६६.८४ वर स्थिरावले.
चेन्नईमध्ये आलेल्या पुरामुळे भारतीय उद्योगांनाही फटका बसणार आहे. वाहन उद्योगाचे केंद्र असलेल्या चेन्नईचा पूर वाहन उद्योगाला फटका देईल.
त्याचप्रमाणे येथून होणारे आऊटसोर्सिंगचे कामही थंडावले आहे. एका सर्वेक्षणाच्या जाहीर झालेल्या निकालांप्रमाणे भारतातील सेवा क्षेत्राच्या वाढीचा वेग मंदावला आहे. याचा भारतीय अर्थव्यवस्थेवरही परिणाम होणार आहे.

Web Title: The US market is below 26,000 level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.