मुंबई : रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. ते रिझर्व्ह बँकेचे २४ वे गव्हर्नर आहेत. मावळते गव्हर्नर रघुराम राजन यांनी मागे ठेवलेल्या वृद्धीला चालना आणि महागाईचे नियंत्रण अशा दुहेरी आव्हानांचा सामना त्यांना करावा लागणार आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून त्यांचा कार्यकाळ ४ सप्टेंबरपासून गृहीत धरला जाईल. जानेवारी २0१३ पासून ते रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गर्व्हनर आहेत. त्यांचा पहिला कार्यकाळ संपल्यानंतर ११ जानेवारी २0१६ रोजी त्यांची डेप्युटी गव्हर्नरपदी ३ वर्षांसाठी फेरनिवड करण्यात आली होती. २0 ते २५ अब्ज डॉलरच्या निधीची मुक्तता करणे, पतधोरण समितीची संकल्पना राबविणे आणि बँकांचा व्यवहार स्वच्छ करणे ही त्यांच्या समोरील काही प्रमुख आव्हाने आहेत. वृद्धीला चालना देणारे धोरण आखताना महागाई वाढणार नाही, याची काळजी त्यांना घ्यावी लागेल. हे एक खडतर काम आहे.
रिझर्व्ह बँकेची धोरणे राबविताना अर्थमंत्रालयाशी संघर्ष होणार नाही, याचीही त्यांना काळजी घ्यावी लागेल. डेप्युटी गव्हर्नर असताना त्यांनी अनेक महत्त्वाचे विभाग हाताळले आहेत. त्याचा त्यांना गव्हर्नर म्हणून काम करताना फायदा होईल. पतधोरण ठरविण्याच्या प्रक्रियेत बदल करण्यासाठी नेमण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीचे ते प्रमुख होते. ब्रिक्स देशांच्या केंद्रीय बँकांत समन्वय निर्माण करण्यासाठी करण्यात आलेल्या आंतर-शासकीय करार आणि आंतर-केंद्रीय बँक कराराच्या प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग होता.
ऊर्जित पटेल यांनी अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सेवेत होते. १९९६ ते १९९७ या काळात ते नाणेनिधीतून रिझर्व्ह बँकेत प्रतिनियुक्तीवर आले. या काळात त्यांनी कर्ज बाजार, बँकिंग सुधारणा, पेन्शन सुधारणा आणि विदेशी चलन वाढविण्याबाबत त्यांनी रिझर्व्ह बँकेला बहुमोल सल्ला दिला. (प्रतिनिधी)
ऊर्जित पटेल यांनी कार्यभार स्वीकारला
रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
By admin | Updated: September 6, 2016 05:20 IST2016-09-06T05:20:28+5:302016-09-06T05:20:28+5:30
रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
