मुंबई : मोटार वाहन कायद्यानुसार प्रवासी बसमधून पार्सलची धंदेवाईक वाहतूक करण्यास मज्जाव असूनही आंतर-शहर प्रवासाच्या बसमधून अशी बेकायदा पार्सल वाहतूक केली जाते, हे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना (आरटीओ) माहीत असलेले उघड गुपित आहे; पण गुजरातमधील एका कल्पक उद्योजकाने या बेकायदा वाहतुकीस आता राजरोसपणे सुसंघटित धंद्याचे स्वरूप देत पार्सलचे नेटवरून बुकिंग करण्यासाठी चक्क एक कंपनी स्थापन केली आहे.
मुंबईहून गुजराथ, राजस्थान, मध्य प्रदेश व कर्नाटकमधील अनेक शहरे व काही प्रमाणात दिल्लीपर्यंत प्रवासी बसमधून पार्सलची बेकायदा वाहतूक केली जाते. प्रत्येक बसची सुमारे ५०० किलो सामान वाहून नेण्याची क्षमता असते. प्रवाशांचे लगेज एवढे नसते. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या जागेत पार्सले ठेवून नेली जातात. ‘आरटीओ’ची तपासणी झालीच तर पार्सले प्रवास करीत असलेल्या प्रवाशांचे लगेज आहे, असे भासविले जाते. प्रत्येक प्रवाशास अशी पार्सले हे त्यांचे लगेज आहे, असे दर्शविणाऱ्या चिठ्ठ्या लिहून दिल्या जातात व वाटेत तपासणी झालीच तर अमूक सामान माझे आहे, असे सांगा, असे त्यांना सांगितले जाते.
सध्याच्या व्यवस्थेत ज्याला पार्सल पाठवायचे असेल त्याला ते बस जेथून सुटते तेथे स्वत: नेऊन द्यावे लागते. शहरात बस जेथे पोहोचते तेथे जाऊन घ्यावे लागते. बस चालविणारी कंपनी स्वत: वाहतुकीसाठी पार्सले गोळा करीत फिरत नसल्याने बसच्या प्रत्येक फेरीला पुरेशी पार्सले मिळतीलच याची खात्री नसते. नेमक्या याच गरजेचे भांडवल करून अहमदाबादमधील प्रशांत शहा या उद्योजकाने ‘लगेजडील्स.कॉम’ या नावाची कंपनी वर्षभरापूर्वी सुरू करून धंदा सुरू केला आहे. नेट बिझिनेसच्या भाषेत शहा यांच्या धंद्याला ‘अॅग्रेगेटर’चा धंदा म्हटले जाते. विविध शहरांमध्ये आंतर-शहर प्रवासी वाहतूक कंपन्यांनी शहा यांच्या कंपनीकडे सदस्य म्हणून नोंदणी करायची. ज्यांना पार्सल पाठवायचे असेल त्यांनी या वेबसाईटवर बुकिंग करायचे. इच्छित गंतव्य स्थान व तेथे जाणाऱ्या बसमध्ये उपलब्ध असलेली जागा यानुसार शहा यांची कंपनी ‘बुक’ झालेली पार्सले ज्या त्या बस कंपन्यांकडे वाहतुकीसाठी वर्ग करते. या बदल्यात शहा यांच्या कंपनीस ठराविक दराने कमिशन मिळते. पार्सल बसवर आणून देणे व बसवरून घेऊन जाणे हा भाग आहेच.
प्रवासी बसमधून पार्सल वाहतूक करण्याचा राजरोस बेकायदा धंदा
मोटार वाहन कायद्यानुसार प्रवासी बसमधून पार्सलची धंदेवाईक वाहतूक करण्यास मज्जाव असूनही आंतर-शहर प्रवासाच्या बसमधून
By admin | Updated: March 9, 2015 23:57 IST2015-03-09T23:57:00+5:302015-03-09T23:57:00+5:30
मोटार वाहन कायद्यानुसार प्रवासी बसमधून पार्सलची धंदेवाईक वाहतूक करण्यास मज्जाव असूनही आंतर-शहर प्रवासाच्या बसमधून
